पीकविमा कंपनीचा अजब कारभार, अंबादास दानवेंना दिला कृषी कार्यालयात जाण्याचा सल्ला
By बापू सोळुंके | Published: November 25, 2022 08:11 PM2022-11-25T20:11:38+5:302022-11-25T20:15:03+5:30
पीक विमा कंपनीकडून मात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला जात नसल्याचे दिसून येत आहे.
औरंगबााद: जिल्ह्यातील सुमारे पाच लाख शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होईल अथवा नाही, याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी शुक्रवारी विभागीय कृषी सहसंचालकांसमोरच शेतकरी म्हणून पीक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा त्यांना जवळच्या कृषी कार्यालयात जाण्याचा सल्ला मिळाला.
जिल्ह्यातील ७लाख ४८ हजार शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा काढला होता. दरम्यान संततधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे खरीप पिकाची मोठी हानी झाली. परिणामी शेतकऱ्यांना दिवाळीही साजरी करता आली नव्हती. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पीक विमा कंपनीकडून मात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला जात नसल्याचे दिसून येत आहे. विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ १ लाख ८४ हजार शेतकऱ्यांनाच कंपनीने विमा मंजूर केला आहे. उर्वरित सुमारे पावणे पाच लाख शेतकरी पीक विमा मिळेल अथवा नाही, तसेच कधी मिळेल याबाबत सांशकता आहे.
विमा कंपनीकडून त्यांना प्रतिसाद मिळत नाही, कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर शेतकऱ्यांना समर्पक उत्तरे मिळत नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी विरोधी पक्षनेते दानवे यांना प्राप्त झाल्या होत्या. यापार्श्वभूमीवर दानवे यांनी शुक्रवारी सकाळी विभागीय कृषी सहसंचालक डॉ. दिनकर जाधव यांच्या कार्यालयात आढावा बैठक घेतली. जालनाचे कृषी अधीक्षक भीमराव रणदिवे, कृषी उप संचालक दत्तात्रय दिवटे, उपविभागीय कृषी अधिकारी धनश्री जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी तेथून पीक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर फोन लावून ते टेंभापुरी येथील शेतकरी बोलत असल्याचे सांगितले.त्यांच्या शेतमालाचे नुकसान झाले असून विमा कंपनीने अद्याप पंचनामा केला नाही, यामुळे आम्हाला विमा कधी मिळेल असा सवाल त्यांनी केला. असता टोल फ्री क्रमांकावरून त्यांना जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला.
साडेसात लाख पीक विमाधारक शेतकरी, कर्मचारी केवळ २८
जिल्ह्यात विमा कंपनीचे २८ कर्मचारी कार्यरत आहेत. ७४ मंडळातील सुमारे पावणेसात लाख शेतकऱ्यांपर्यंत हे कर्मचारी कधी पोहचतील असा सवाल त्यांनी केला. विमा कंपनीचे हे कर्मचारी कृषी पदवीधर अथवा पदविकाधारक असणे गरजेचे आहे. यातील किती कर्मचारी प्रशिक्षित आहेत असा सवाल त्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना केला.