मध्य रेल्वेचा अजब कारभार; रात्री ८ वाजेची औरंगाबाद-मुंबई रेल्वे आज सकाळी ७ वाजता गेली
By संतोष हिरेमठ | Published: January 31, 2023 12:44 PM2023-01-31T12:44:07+5:302023-01-31T12:45:14+5:30
‘मध्य रेल्वे’कडून प्रवाशांची थट्टा, रात्रभर प्रवाशांचे हाल, सिकंदराबादहून रिकामी रेल्वे बोलविण्याची वेळ
औरंगाबाद : मध्य रेल्वे मराठवाड्यावर अन्याय करते, अशी नेहमीच ओरड होते. आता मध्य रेल्वेने पुन्हा एकदा प्रवाशांची थट्टाच केल्याचा प्रकार सोमवारी घडला. औरंगाबाद- सी.एस.एम.टी. मुंबई ही विशेष रेल्वे प्रवासाच्या काही तास आधी रात्री ८ वाजेऐवजी ६ तास उशिराने पहाटे २ वाजता रवाना होणार असल्याचे मेसेज प्रवाशांना पाठविण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात रेल्वे आज सकाळी ७ वाजता रवाना झाली. संपूर्ण प्रवासाचे नियोजनच विस्कळीत झाल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.
मध्य रेल्वेने प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन ‘ट्रेन्स ऑन डीमांड’ श्रेणीत विशेष रेल्वेच्या फेऱ्या जाहीर केल्या. यात औरंगाबाद- सी.एस.एम.टी. मुंबई विशेष रेल्वे सोमवारी रात्री ८ वाजता सोडण्यात येणार होती. सलग सुट्यांमुळे मुंबईला जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेचे आरक्षण फुल होते. या विशेष रेल्वेमुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना आधार मिळाला. परंतु प्रवासाच्या काही तास आधीच रेल्वे सुटण्याची वेळ बदलल्याचे मेसेज प्रवाशांना येऊन धडकले. अनेक प्रवासी स्टेशनवर पोहोचले होते, तर काही रस्त्यात होते.
मुंबईहून येणार होती रिकामी रेल्वे, पण...
या विशेष रेल्वेसाठी मुंबईहून रिकामी रेल्वे (रॅक) येणार होती. परंतु ऐनवेळी सिकंदराबादहून जवळपास १७ बोगींची रिकामी रेल्वे मागविण्याची वेळ ओढवल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
रेल्वे तब्बल ११ तास उशिरा
ही विशेष रेल्वे रात्री ८ वाजता रवाना झाल्यानंतर पहाटे ३.५० वाजता मुंबईला पोहोचणार होती. त्यामुळे मुंबईत जाऊन प्रवाशांना नियमित कामे प्रवाशांना करता येणार होती. परंतु वेळ बदलली आणि मुंबई पोहोचण्याच्या वेळे पेक्षाही तीन तास नंतर सकाळी ७ वाजता ही रेल्वे औरंगाबादहून रवाना झाली.