अजबच: एक गाव दोन जिल्ह्यांत; पण स्थिती... ‘घर का ना घाट का’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2023 05:47 AM2023-06-17T05:47:26+5:302023-06-17T05:48:55+5:30
तळेगाववाडीतील पाचशे कुटुंबीयांचे लालफितीच्या कारभारात हाल
रऊफ शेख
लोकमत न्यूज नेटवर्क, फुलंब्री (छत्रपती संभाजीनगर): पाचशे कुटुंबसंख्या असलेल्या तळेगाव वाडीची औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री आणि जालना जिल्ह्यातील भोकरदन या दोन तालुक्यांच्या दप्तरी नोंद आहे. मात्र, शासकीय लाभाच्या योजनांच्या दोन्ही तालुक्यांच्या यादीत हे गाव ‘मिसिंग’ आहे. तळेगाव व तळेगाव वाडी (बिस्मिल्ला गाव) ही दोन गावे मिळून एक ग्रामपंचायत आहे. भोकरदन तालुक्यातील तळेगाव व तळेगाव वाडीचा सहा वर्षांपूर्वी फुलंब्री तालुक्यात समावेश केला. वर्षभरानंतर गावाला पुन्हा भोकरदन तालुक्याला जोडले. पण शिक्षण व ग्रामपंचायतीचा कारभार फुलंब्री तालुक्यातूनच आजही सुरू आहे. ग्रामसेवक फुलंब्री पंचायत समितीअंतर्गत काम करतात. महसूलचा कारभार भोकरदनमध्ये असल्याने तलाठी येथील तहसीलदारांच्या अंतर्गत काम करतात. दोन जिल्हे व दोन तालुक्यांत हे गाव अडकले आहे.
शेतीची किंवा जागेची रजिस्ट्रीही होत नाही
- फुलंब्री किंवा भोकरदन तालुक्यात गावातील शेतीची किंवा जागेची रजिस्ट्रीच होत नाही.
- ग्रामस्थ आरिफ हाकिम पठाण म्हणाले, माझ्या शेतीचा सौदा झाला; रीतसर रजिस्ट्री करण्यासाठी फुलंब्री तहसील कार्यालयात गेलो असता तुमच्या गावाचे नाव ऑनलाइनमध्ये येत नाही, असे सांगण्यात आले.
- शेतीचा खरेदी-विक्री व्यवहारच न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात ते ४ वर्षांपासून चकरा मारत आहेत.
- ‘पीएम किसान’चा लाभही मिळेना
येथील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही, याकडे मजीद खाँ महेबूब खाँ यांनी लक्ष वेधले. हे गाव महसुली नोंदीनुसार भोकरदन तालुक्यात आहे. ग्रामस्थांच्या निवेदनावरून फुलंब्री तालुक्यात समवेश करण्यासंबंधीचा प्रस्ताव आम्ही वरिष्ठांकडे पाठविला ला आहे. त्यावर अद्याप निर्णय आलेला नाही. -डॉ. शीतल राजपूत, तहसीलदार