झेडपीत अजब प्रकार;सेवा निवृत्तीनंतरही ‘अभियंता’ येतोय ड्युटीवर,व्हॉट्सॲप ग्रुपमध्येही ॲक्टीव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 01:24 PM2022-03-16T13:24:59+5:302022-03-16T13:45:16+5:30
महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्र गळ्यात घालून वावरतात. प्रशासनाने त्यांना मुदतवाढ दिल्याचा समज अनेेकांचा झाला.
- बापू सोळुंके
औरंगाबाद: गंगापूर पंचायत समितीतून दोन महिन्यापूर्वी निवृत्त झालेला स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आजही सरकारी बांधकाम साईटला नियमित भेटी देत फिरतो आहे. शासकीय कागदपत्राच्या फाईल्स सोबत बाळगणे, एवढेच नव्हे तर साईटला भेट दिल्याची छायाचित्रेही तो कार्यालयीन व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करतो आहे.
शेख इकबाल हे अभियांत्रिकी सहायक म्हणून गंगापूर पंचायत समितीत कार्यरत होते. त्यांच्याकडे काही दिवस शाखा अभियंत्याचा पदभार होता. ३१ जानेवारी रोजी ते निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांना सरकारी कामाचा लळा कायम आहे. गंगापुर पंचायत समितींतर्गत शामाप्रसाद मुखर्जी रूरलर्बन स्टडी सेंटरचे त्यांचे काम नियमित सुरू आहे. येथील इमारत बांधकामाला ते नियमित भेट देतात. ठेकेदार, सुपरवायझर आणि कामगारांना सूचना देतात.
व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲक्टीव्ह
इकबाल शेख हे जि.प. बांधकाम विभागांत कार्यरत होते. यामुळे या विभागाच्या सरकारी व्हॉटसॲप ग्रुपमध्ये ते होते. मात्र ते आताही या व्हॉटसॲप ग्रुपमध्ये ॲक्टीव्ह आहेत. जोगेश्वरीतील इमारत बांधकामाच्या साईटवरून काही साहित्य चोरीला गेले. याची पाहणीही त्यांनी वाळूज पोलिसांना सेाबत घेऊन केली. याविषयीचे छायाचित्रे त्यांनी रूरबन गाव समुह ग्रुपवर टाकले.
आयकार्ड घालून फिरतात
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासकीय ओळखपत्र गळ्यात घालून वावरता येत नाही. मात्र हा नियम शेख इकबाल यांना लागू नाही. ते महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्र गळ्यात घालून वावरतात. प्रशासनाने त्यांना मुदतवाढ दिल्याचा समज अनेेकांचा झाला.
कनिष्ठ अभियंत्याना त्यांची मदत होते
शेख इकबाल हे दोन महिन्यापूर्वी निवृत्त झाले. मात्र ते गंगापूर येथील शाखा अभियंत्याच्या मदतीसाठी त्यांच्यासोबत असतात. ते कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप करीत नाही. शिवाय त्यांची बांधकाम विभागाला मदत होते.
- कल्याण भोसले, प्रभारी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, जि.प.
ठेकेदाराकडे कामाला
मी सेवानिवृत्त झाल्यानंतर रूलबनचे काम करणाऱ्या ठेकेदाराने मला कामावर बोलावले आहे. ते मला चांगले मानधन देत असल्याने मी त्यांच्या साईटवर गेलो होतो. त्या साईटवरून साहित्य चोरीला गेले होते. त्याचे छायाचित्रे ग्रुपवर टाकली. मी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक असल्याने एम.बी.रेकॉर्ड करू शकत नाही.
-शेख इकबाल.