गुळगुळीत सिमेंट रस्ता केला, पुन्हा उखडून फेकला; छत्रपती संभाजीनगर मनपाचे अजब काम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 01:01 PM2024-10-22T13:01:45+5:302024-10-22T13:02:25+5:30
कोट्यवधी रुपयांच्या सिमेंट रस्त्यांची कामे सुरू असताना मनपा अधिकारी अजिबात फिरकत नाहीत. कंत्राटदार आपल्या मनानुसारच काम करतो.
छत्रपती संभाजीनगर : शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून गुळगुळीत सिमेंट रस्ते करण्यात येत आहेत. या कामांच्या गुणवत्तेबाबत ओरड झाली, तरी अधिकारी, कर्मचारी लक्ष द्यायला तयार नाहीत. जालना रोडवर एसएफस शाळेसमोरील बसय्यैनगर-व्यंकटेशनगर येथील सिमेंट रस्ता महापालिकेने अचानक खोदून ठेवला. खोदलेला सिमेंटचा मलबाही तसाच पडून असल्याने वाहनधारकांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.
ॲपेक्स हॉस्पिटलसमोरील रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था होती. महापालिका प्रशासनाने आठ महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम करण्याचा निर्णय घेतला. ६० लाखांहून अधिक खर्चाच्या कामाची निविदा काढली. बालाजी कन्सट्रक्शनला काम देण्यात आले. कंत्राटदाराने सात महिन्यांपूर्वी कामही केले. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी या भागात अन्य एका कामाच्या पाहणीसाठी गेले, तेव्हा या रस्त्याचा सरफेस खराब झाल्याचे निदर्शनास आले. अधिकाऱ्यांनी त्वरीत जेवढा खराब पॅच आहे, तो खोदून नव्याने करण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला दिले. कंत्राटदाराकडून बऱ्याच दिवसांपासून चालढकल करण्यात येत होती. शेवटी सोमवारी रस्त्याचा काही भाग खोदून काढण्यात आला. खोदण्यात आलेला मलबाही उचलण्याची तसदी संबंधित कंत्राटदाराने घेतली नाही. त्यामुळे वाहनधारकांना बराच त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
सरफेस खराब झालेच कसे?
कोट्यवधी रुपयांच्या सिमेंट रस्त्यांची कामे सुरू असताना मनपा अधिकारी अजिबात फिरकत नाहीत. कंत्राटदार आपल्या मनानुसारच काम करतो. रस्त्याचा सरफेस खराब झाला म्हणजे शेड्युल बी-नुसार ठरलेले मटेरियल वापरण्यात आले नाही. गुणवत्ता अधिकाऱ्यांनी तपासणी केली नाही. प्रशासक किंवा अन्य अधिकाऱ्यांनी हा रस्ता बघितला नसता, तर कंत्राटदाराला रस्ता खोदण्याची वेळच आली नसती.
काय म्हणाले अधिकारी
ॲपेक्स हॉस्पिटलसमोरील रस्त्याचा काही भाग खराब आहे. कंत्राटदाराला काढून नव्याने करण्याचे आदेश दिले. ही नियमित प्रक्रिया आहे. लवकरच काम पूर्ण होईल. संबंधित कामाची मुदत संपलेली नव्हती.
- बी. डी. फड, कार्यकारी अभियंता मनपा.