अज्ञाताने सैन्य जवानास ‘स्ट्रॅटेजी सेंटर’ व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये केलं अॅड; ९ लाखांची झाली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 14:59 IST2025-01-10T14:58:00+5:302025-01-10T14:59:06+5:30
व्हॉट्सॲपच्या अनोळखी ग्रुपवरील माहितीवर विश्वास ठेवणे लष्कराच्या जवानाला पडले महागात; आधी ९ हजारांचा नफा दिला, नंतर १३ दिवसात ९ लाखांचा गंडा घातला

अज्ञाताने सैन्य जवानास ‘स्ट्रॅटेजी सेंटर’ व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये केलं अॅड; ९ लाखांची झाली फसवणूक
छत्रपती संभाजीनगर : आदित्य बिर्ला ग्रुपच्या आयपीओत गुंतवणुकीचे आमिष दाखवून लष्करातील जवानाला सायबर गुन्हेगारांनी १३ दिवसांत ९ लाख रुपयांचा गंडा घातला. बुधवारी हर्सूल पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
हर्सूल पोलिस ठाण्याच्या निरीक्षक डॉ. सुनीता मिसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनाथ वाघ (४९, रा. मयूर पार्क) हे लष्करात जवान आहेत. ८ डिसेंबर रोजी त्यांना अज्ञाताने ‘स्ट्रॅटेजी सेंटर’ नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केले. त्यात आर्या आनंद नावाच्या व्यक्तीने आदित्य बिर्ला कंपनीतून बोलत असल्याचे सांगून शेअर मार्केट ट्रेडिंगचे प्रशिक्षण देण्याचे आमिष दाखवले. एक लिंक पाठवून त्यांना ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. बिर्ला कंपनीच्या आयपीओसाठी अप्लाय करण्यास सांगितले. कॉलवरील व्यक्तीने त्यांचा १८ डिसेंबरपर्यंत विश्वास संपादन केला. त्यानंतर आर्या आनंदच्या सूचनेनुसार, वाघ यांनी २८ व ३० डिसेंबर रोजी त्यांना दोन टप्प्यांत अनुक्रमे ८ लाख २० हजार व ७ लाख २० हजार रुपये बँक खात्यात पाठवले.
म्हणे २०० टक्के नफा झालाय, २० टक्के सर्व्हीस फी भरा
हा सर्व व्यवहार सायबर गुन्हेगारांच्या एका बनावट वेबसाईटद्वारे सुरू होता. वाघ यांना सुरुवातीला १८ डिसेंबर रोजी ५० हजारांच्या गुंतवणुकीवर ९ हजारांचा नफा देखील दिला. याच वेबसाईटवर त्यांचे शेअर मार्केटचे खाते त्यात होणारा नफा देखील दिसत होता. ३१ डिसेंबर रोजी वाघ यांनी वेबसाईटद्वारे शेअर्स विकण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुन्हेगारांनी त्यांना पुन्हा संपर्क साधून तुम्हाला २०० टक्के नफा झाला आहे. त्यामुळे ती रक्कम काढण्यासाठी २० टक्के सर्व्हीस फी भरण्यास सांगितले. त्यानंतर मात्र वाघ यांना आपण फसवले जात असल्याचे लक्षात आले. तोपर्यंत त्यांनी गुन्हेगारांना ९ लाख रुपये दिले होते.
साधर्म्य साधनारी वेबसाईट
आदित्य बिर्ला कंपनीच्या नावाशी साधर्म्य साधणारी वेबसाईट गुन्हेगाराने तयार केली होती. त्यात काही अक्षरांमध्येच बदल केला होता. त्यामुळे त्यांचा विश्वास बसत गेला. निरीक्षक डॉ. सुनीता मिसाळ अधिक तपास करत आहेत.