वडगावात रस्त्यावर साचले सांडपाण्याचे तळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:33 PM2019-06-01T23:33:29+5:302019-06-01T23:34:06+5:30
शिवाजीनगरात शनिवारी चेंबर तुंबून नागरी वसाहतीतील मुख्य चौकात सांडपाण्याचे तळे साचले.
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीकडून नियमित नालेसफाई केली जात नसल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शिवाजीनगरात शनिवारी चेंबर तुंबून नागरी वसाहतीतील मुख्य चौकात सांडपाण्याचे तळे साचले. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर ग्रामपंचायतीने चेंबर सफाईचे काम सुरु केले.
येथील नागरी वसाहतीत ड्रेनज व सांडपाणी वाहून जाण्यासाठी भूमिगत गटारीची सोय करण्यात आली आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाकडून चेंबरची नियमित सफाई केली जात नाही. चेंबरमध्ये अडकलेल्या कचरा व मतीमुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. वारंवार चेंबर तुंबून सांडपाणी नागरिकांच्या घरासमोर साचत आहे.
घाणीमुळे साथीचे आजार जडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याविषयी अनेकवेळा सांगून याकडे ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. संविधान चौकात शनिवारी चेंबर तुंबून सांडपाणी रस्त्यावर आले. महिला व लहान मुलांना तर घाण पाण्यातूनच ये-जा करावी लागली.
नागरिकांची ओरड सुरु होताच ग्रामपंचायतीने चेंबर सफाईचे काम हाती घेवून कामाला सुरुवात केली. कर्मचाऱ्यांकडून दुपारपर्यंत सफाईचे काम सुरु होते. सारखाच सांडपाण्याचा त्रास असल्याने आरोग्यविषयक समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.