फुलंब्रीत भाजपची ताकद आणखी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 01:20 AM2017-12-15T01:20:23+5:302017-12-15T01:20:37+5:30
फुलंब्री नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसने राष्टवादी काँग्रेस व शिवसेनेला सोबत घेऊन ही निवडणूक लढविली खरी; पण निकाल विरोधात गेल्याने त्यांना जबर धक्का बसला. शहरात ‘कमळ’ चांगलेच फुलल्याने भाजपसाठी हा विजय उत्साह देणारा ठरला.
न.पं. निवडणूक विश्लेषण-रऊफ शेख
फुलंब्री नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसने राष्टवादी काँग्रेस व शिवसेनेला सोबत घेऊन ही निवडणूक लढविली खरी; पण निकाल विरोधात गेल्याने त्यांना जबर धक्का बसला. शहरात ‘कमळ’ चांगलेच फुलल्याने भाजपसाठी हा विजय उत्साह देणारा ठरला.
फुलंब्री नगर पंचायत स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. गेल्या तीन वर्षांपासून या निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्यांनी १० दिवस निवडणूक मैदान गाजवले. भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीने एकत्र येऊन शहर विकास आघाडी बनविली. गेल्या दहा दिवसांच्या प्रचारात सर्वच पक्षांच्या नेत्यांनी अनेक प्रचारसभा घेऊन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्याने शहरवासीयांना रणधुमाळी पाहावयास मिळाली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा. चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर, आ. अब्दुल सत्तार, माजी आ. डॉ. कल्याण काळे, आ. अतुल सावे, नारायण कुचे, इद्रीस मुलतानी, नामदेव पवार, सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर आदींनी प्रचारदौरे केले.
हरिभाऊ बागडे यांना फायदा
फुलंब्री तालुक्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या जि.प., पं.स. निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले होते.
फुलंब्री शहरात मागील काळात भाजपला दोन ते अडीच हजारांपेक्षा जास्त मतदान मिळत नव्हते; पण या निवडणुकीत पाच हजार मतदान मिळाले, हे संकेत भाजपसाठी आनंददायीच ठरले.
शहर विकास आघाडीच्या पॅनलचे आठ उमेदवार हे सर्वसामान्य असल्याने आघाडीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार केवळ १९० मतांनी पराभूत झाला. या निवडणुकीत जीएसटी, कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, सेंद्रिय बोंडअळी आदी विषयांवर विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल केला.
त्यावेळी मतदारांनी टाळ्या वाजवून समर्थन केले असले तरी मतपेटीत भाजपच्या बाजूने कल दिला. या निवडणुकीत चार नगरसेवक थोड्या मतांनी विजयी झाले.
एक उमेदवार तर केवळ चार मतांनी निवडून आला. या वॉर्डात सहा मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला. या मतदारांनी तसे न करता सरळ मतदान केले असते, तर चित्र बदलले असते. या निकालाने उमेदवार, कार्यकर्त्यांना मताची किंमत कळली आहे.
मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचा भाजपला फायदा
फुलंब्री शहरात १४ हजार मतदार आहेत; पण नगर पंचायत निवडणुकीत केवळ साडेदहा हजार मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी कमी झाली. आघाडीच्या वतीने मतदान करून घेण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. मतदानाची टक्केवारी वाढली असती, तर निकाल वेगळे लागले असते. कमी मतदानाचा फायदा भाजपला नक्कीच झाला, हे मात्र खरे.शिरसाठ यांना पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान
नगर पंचायत स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक झाली. यात पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान सुहास शिरसाठ यांना मिळाला. राज्यात भाजपची सत्ता असल्याने आगामी काळात शहराचा विकास करण्याचे आव्हान आता त्यांच्यासमोर आहे.