आयुष्याची दोर बळकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:53 AM2017-08-05T00:53:05+5:302017-08-05T00:53:05+5:30
वडगाव कोल्हाटी येथे शुक्रवारी (दि.४) दुपारी पाणी शेंदताना तोल जाऊन विहिरीत पडलेल्या महिलेचे प्राण धाडसी युवकामुळे वाचले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथे शुक्रवारी (दि.४) दुपारी पाणी शेंदताना तोल जाऊन विहिरीत पडलेल्या महिलेचे प्राण धाडसी युवकामुळे वाचले. खाजगी रुग्णालयात त्या महिलेवर उपचार सुरू आहेत.
मंगलबाई प्रकाश शेजुळे (२८, रा. वडगाव कोल्हाटी) ही महिला शुक्रवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयालगतच्या सार्वजनिक विहिरीवर पाणी भरत होती. बादलीने पाणी शेंदत असताना अचानक तोल गेल्यामुळे मंगलबाई विहिरीत पडल्या. विहिरीवरील अन्य महिलांनी आरडा-ओरड केली. रस्त्याने जाणाºया एका दुचाकीस्वार युवकाने विहिरीकडे धाव घेऊन क्षणार्धात विहिरीत उडी मारली. पाण्यात गटांगळ्या खाणाºया मंगलबाई यांना त्याने पकडले.
आरडा-ओरड ऐकून गावातील सचिन कुसळकर, संदीप आढाव, गणेश काळे या युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. युवकांनी दोर विहिरीत सोडून मंगलबाई व ‘त्या’ वाहनचालकास बाहेर काढले. विहिरीत जवळपास १० ते १५ फूट पाणी असल्यामुळे मंगलबाई यांच्या नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना तात्काळ बजाजनगरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
धोकादायक विहिरीकडे दुर्लक्ष
या विहिरीला संरक्षक कठडे नाही. लहान मुले खेळताना विहिरीजवळ येतात. त्यामुळे गंभीर घटनेची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वी पाणी भरताना एका तरुणीचा या विहिरीत पडून मृत्यू झाला होता. या विहिरीलगत संरक्षक कठडे उभाºयासाठी ग्रामपंचायत कानाडोळा करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. ग्रामपंचायत कार्यालयाजवळच ही सार्वजनिक विहिरी असून, या विहिरीवर पाणी भरण्यासाठी नागरिकांची कायम गर्दी असते.