‘सीईओं’च्या दालनासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:56 AM2017-09-02T00:56:14+5:302017-09-02T00:56:14+5:30
घोषणा देत जिल्हा परिषदेतील सत्ताधारी शिवसेना- काँग्रेस आघाडीच्या सदस्यांनी शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांच्या दालनासमोरच ठिय्या मारला
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांना तात्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी, दलित, बहुजनांची अडवणूक करणाºया प्रशासनाचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय, अशा गगनभेदी घोषणा देत जिल्हा परिषदेतील सत्ताधारी शिवसेना- काँग्रेस आघाडीच्या सदस्यांनी शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांच्या दालनासमोरच ठिय्या मारला. तथापि, या घटनेने आपण व्यथित झालो आहोत. ही घटना आपल्या जिल्ह्यासाठी आनंददायी नाही, अशा शेलक्या शब्दात मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांनी सदस्यांच्या आंदोलनाची निर्भत्सना केली.
मावळत्या जि. प. सदस्य मंडळाच्या कार्यकाळात १६ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या समाजकल्याण विषय समितीने दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत २३७ प्रस्तावांना मान्यता दिली. तेव्हापासून या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत चालढकल केली जात आहे.
२३ आॅगस्ट रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी या विषयावर प्रशासनाला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला आणि दलित वस्ती सुधार योजनेच्या संचिकेविषयी माहिती करून घेतली. तेव्हा येत्या दोन दिवसांत या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी सभेत दिले, असे सदस्यांचे म्हणणे आहे.
तथापि, २३ आॅगस्टनंतर दहा दिवसांचा कालावधी लोटला तरी प्रशासनाने ‘त्या’ संचिकेबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे संतप्त बांधकाम सभापती विलास भुमरे, समाजकल्याण सभापती धनराज बेडवाल, शिक्षण सभापती मीनाताई शेळके, महिला व बालकल्याण सभापती लोहकरे आदींच्या नेतृत्वाखाली सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास सेना- काँग्रेस सदस्यांनी आर्दड यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला व घोषणाबाजी सुरू केली. काही अवधीतच पोलिसांचा मोठा ताफा तिथे पोहोचला.
त्यानंतर कृष्णा पाटील डोणगावकर, विलास भुमरे, रमेश गायकवाड, किशोर बलांडे आदींच्या शिष्टमंडळाने दालनात जाऊन आर्दड यांची भेट घेतली व सदस्यांच्या भावना ऐकून घेण्यासाठी त्यांना सोबत बाहेर आणले. गुरुवारपर्यंत ही प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिल्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्या सदस्यांना ताब्यात घेऊन क्रांतीचौक ठाण्यात नेले.