घाटीत होणार स्ट्रेचर पॉइंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:34 AM2018-05-28T01:34:29+5:302018-05-28T01:34:55+5:30
घाटी रुग्णालयात अखेर नातेवाईकांची गैरसोय टाळण्यासाठी स्ट्रेचर पॉइंट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात अखेर नातेवाईकांची गैरसोय टाळण्यासाठी स्ट्रेचर पॉइंट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांना एक सेवक आणि एक स्ट्रेचर पुरविण्यात येईल, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय विभागाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी शुक्रवारी स्ट्रेचर ढकलणे ही कर्मचाऱ्यांचीच जबाबदारी आहे. ती त्यांनी पार पाडली पाहिजे, असे बजावले. परंतु या सूचनेचा घाटी रुग्णालय प्रशासनाला विसर पडला. डॉ. लहाने यांच्या दौ-याच्या दुस-याच दिवशी शनिवारी नातेवाईकच स्ट्रेचरवरून रुग्णांना घेऊन जात असल्याचे पाहायला मिळाले. रुग्णांना स्ट्रेचरवरून घेऊन जाताना नातेवाईकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. याविषयी ‘लोकमत’ने २७ मे रोजी ‘सहसंचालकांच्या सूचनेचा विसर’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले.
वृत्त प्रकाशित होताच घाटी प्रशासनाकडून रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजनेचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये रुग्णालयात स्ट्रेचर पॉइंट तयार करण्यात येणार आहे. याठिकाणी एका वेळी किमान पाच चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि तितकेच स्ट्रेचर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना स्ट्रेचरसह एक सेवक देण्यात येईल. अपघात विभाग आणि मेडिसीन विभागाच्या इमारत या दोन ठिकाणी स्ट्रेचर पॉइंट राहणार आहेत. याबरोबर रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी भरण्यासाठी प्रशासनातर्फे वरिष्ठांकडे परवानी मागण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली. स्ट्रेचर पॉइंटमुळे किमान घाटीत यापुढे नातेवाईकांवर स्ट्रेचर ढकलण्याची वेळ येणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.