कुख्यात टिप्यासारख्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:02 AM2020-12-30T04:02:51+5:302020-12-30T04:02:51+5:30
औरंगाबाद : गॅंग तयार करून दहशत निर्माण करण्याचे फॅड शहरात वाढत चालले आहे. मात्र ही शहराची संस्कृती नाही. शहरात ...
औरंगाबाद : गॅंग तयार करून दहशत निर्माण करण्याचे फॅड शहरात वाढत चालले आहे. मात्र ही शहराची संस्कृती नाही. शहरात कुणी असा प्रयत्न करीत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिला.
कुख्यात टिप्यापाठोपाठ बेगमपुरा आणि हर्सूल येथील गुंडांची कारागृहातून सुटल्यानंतर मिरवणूक काढल्याच्या घटना गेल्या काही महिन्यात घडल्या. पुंडलिकनगर रस्त्यावर कुख्यात टिप्या एका तरुणीसोबत बीअर पीत नृत्य करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पोलिसांनी टिप्यावर कारवाई करून त्याला जेलमध्ये पाठवले. काही दिवसानंतर टिप्या जामिनावर बाहेर आला. अशाच प्रकारे बेगमपुरा आणि हर्सूल परिसरातील गुन्हेगाराने कारागृहातून बाहेर आल्यावर शक्तिप्रदर्शन करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांच्यासह अन्य लोकांवर पोलिसांनी कारवाई केल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
चौकट
भूखंड माफियांवर पोलिसांची नजर
मालमत्ता आणि भूखंड खरेदी-विक्रीत फसवणूक झाल्याच्या तक्रारी मोठ्या संख्येने येत आहेत. सामान्य नागरिकांची संपत्ती हडपल्या मागे भूखंड माफिया आणि व्हाइट कॉलर मंडळीही असू शकते, त्यांच्यावर पोलिसांची नजर असल्याची माहिती, गुप्ता यांनी दिली.
========
दुचाकी चोरी रोखण्याचे आव्हान
पोलीस आयुक्त म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून शहरांमध्ये दुचाकी चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना काही यश येत आहे. मात्र वाहनचोरी रोखण्याचे आव्हान आमच्यासमोर आजही कायम आहे.
============
हातात स्मार्ट फोन; मात्र आपण स्मार्ट नाही
आपल्या हातात स्मार्ट फोन आले मात्र आपण स्मार्ट न झाल्यामुळे सायबर गुन्हेगार रोज ऑनलाइन फसवणूक करतात. नागरिक अनावश्यक ॲप्लिकेशन डाउनलोड करताना मोबाइल डेटा पाहण्याचे अधिकार देतात. हा डेटा मिळवून गुन्हेगार ऑनलाइन फसवणूक करतात. १० टक्केपेक्षा अधिक व्याज देण्याचे आमिष दाखविणारा एक तर गुन्हेगार असतो नाही तर तो तुम्हाला गंडविणारा असतो. यामुळे जास्तीच्या व्याजाला बळी पडू नये. शिवाय स्वस्तात आणि झटपट कर्जाच्या आमिषाने फसवणूक करणारे ऑनलाइन गुन्हेगार सक्रिय आहेत. यामुळे नागरिकांनी अशी प्रलोभने दाखविणाऱ्यांपासून सावधान राहावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.