छत्रपती संभाजीनगरात कडकडीत बंद; ठिकठिकाणी रस्तारोको अन् घोषणाबाजी
By बापू सोळुंके | Published: September 4, 2023 01:07 PM2023-09-04T13:07:24+5:302023-09-04T13:08:34+5:30
शहरातील क्रांती चौक येथे सर्वपक्षीय मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
छत्रपती संभाजीनगर : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने आज छत्रपती संभाजीनगर शहर आणि औरंगाबाद जिल्हाबंद चे आयोजन करण्यात आले आहे. या बंदला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवली. विशेषतः मुख्य बाजारपेठ बाजारपेठ आणि तही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्याने हा बंद यशस्वी झाल्याचे दिसत आहे.
शहरातील क्रांती चौक येथे सर्वपक्षीय मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. हे कार्यकर्ते एक मराठा लाख मराठा ,राज्य सरकारचा करायचं काय खाली मुंडकं वर पाय ,मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांना बडतर्फ करा अशा घोषणा पदाधिकारी देत आहेत. यातील काही कार्यकर्ते रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन देत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर सहाय्यक आयुक्त गणपत शिंदे आणि अन्य पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने पोलिसासह उपस्थित आहेत.