छेडछाड, दादागिरीला विद्यार्थी वैैतागले
By Admin | Published: May 24, 2016 12:53 AM2016-05-24T00:53:02+5:302016-05-24T01:21:19+5:30
औरंगाबाद : रत्नप्रभा मोटार्सशेजारी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या तरुण, तरुणींना गाठून लुटमार आणि छेडछाड केली जात आहे
औरंगाबाद : रत्नप्रभा मोटार्सशेजारी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या तरुण, तरुणींना गाठून लुटमार आणि छेडछाड केली जात आहे. या गुंडांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा, यासाठी सुमारे ७० तरुणांनी आज पोलीस आयुक्त अमितेशकु मार यांच्याकडे धाव घेतली.
बाबा पेट्रोलपंप परिसरामागील अंतर्गत रस्त्यावर एक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र्र आहे. केंद्रात अभ्यास करण्यासाठी ये-जा करणाऱ्या तरुण, तरुणींना गाठून काही गुंड सतत दारूसाठी पैशाची मागणी करतात. पैसे देण्यास नकार देणाऱ्यांना ते मारहाण करतात. योगेश सुभाष आहेर या तरुणाला २१ मे रोजी दुपारी दोन अनोळखी गुंडांनी अडवून त्याच्याकडे पैशाची मागणी केली. त्याने पैसे नसल्याचे सांगताच आरोपींनी त्याच्या डोक्यात फरशी मारली. या घटनेत त्याला जबर दुखापत झाली आहे. याप्रकरणी त्याने क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, बँकिंगसह अन्य विभागांच्या परीक्षा देऊन शासकीय अधिकारी होण्यासाठी खेड्यापाड्यातून हे विद्यार्थी औरंगाबादेत आलेले आहेत. यातील अनेक जण रूम भाड्याने घेऊन राहतात, तर काही जण वसतिगृहात राहतात. अनेक तरुण, तरुणी एकट्याच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि अभ्यासिकेत ये-जा करतात. त्यांना सतत होणाऱ्या मारहाण आणि लुटमारीमुळे ते घाबरले आहेत.
सिल्लोड तालुक्यातील निल्लोड या गावातून आलेला योगेश आहेर हा तरुण २१ मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अभ्यासिकेत पायी जात होता. त्यावेळी दोन गुंडांनी त्यास अडवले. यापैकी एकाने योगेशकडे दारूसाठी पैशाची मागणी केली. योगेशजवळ पैसेच नसल्याने त्याने तसे सांगितले. यावेळी त्यांनी त्याच्या खिशात हात घातला. खिशातील कागद खाली पडला म्हणून योगेश खाली वाकताच या गुंडांनी त्याच्या डोक्यात फरशी घातली. या घटनेत योगेशच्या डोळ्याखाली गंभीर जखम झाली. त्यानंतर त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटना क्रमांक
गजानन गोराडे या तरुणास रत्नप्रभा कॉम्प्लेक्सच्या बाजूच्या रस्त्यावर दोन तरुणांनी अडविले. आरोपींनी त्यास आमच्या विरोधात पोलिसांत तक्रार करतो का, असे म्हणून शिवीगाळ केली. याप्रसंगी बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर गजानन गोराडे यांनी पुन्हा आरोपीविरोधात क्रांतीचौक ठाण्यात तक्रार दाखल केली.
घटना क्रमांक
मनीषा पाटील आणि अनिता सोनवणे (नाव बदलले आहे) या दोन्ही तरुणींची चार दिवसांपूर्वी या गुंडांनी छेड काढली. त्यानंतर त्यांनी तातडीने दामिनी पथकाशी संपर्क साधून घडलेली घटना सांगितली. त्यावेळी दामिनी पथकाने त्यांच्याकडून घटनास्थळाची माहिती जाणून घेतली. मात्र, अर्धा तासानंतरही दामिनी पथक अथवा अन्य पोलिसांची मदत त्यांना मिळाली नाही. शिवाय एका तरुणीच्या घरासमोरून हे गुंड सतत ये-जा करीत असतात. त्यामुळे ते एखाद्या दिवशी आपल्या घरात घुसतील या भीतीपोटी आपण पोलीस आयुक्तांकडे धाव घेतल्याची त्यांनी सांगितले.