अटीतटीच्या लढतीत प्रस्थापितांना धक्के
By Admin | Published: November 4, 2015 12:08 AM2015-11-04T00:08:28+5:302015-11-04T00:23:05+5:30
जालना : जिल्ह्यातील ४५६ ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. या निवडणुकांत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक प्रस्थापितांना
जालना : जिल्ह्यातील ४५६ ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. या निवडणुकांत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक प्रस्थापितांना धक्के बसल्याचे चित्र या निकालावरून स्पष्ट होत आहे. तर मतदारांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचे निकालावरून दिसून येते.
जिल्ह्यातील ४७८ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने निवडणूक विभागाच्या वतीने निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार १ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्याचे तर ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. तत्पूर्वी २२ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या होत्या. गाव पातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाल्याने ही निवडणूक अनेकांनी प्रतिष्ठेची केली होती.
कधी नव्हे ती, चुरशीची लढत या निवडणुकीदरम्यान पहायला मिळाली. प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच स्थानिक आघाड्यांनीही प्रचारात आघाडी घेत ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
या निवडणुकीत पक्षीय राजकारणापेक्षा अंतर्गत गटबाजी, भाऊबंदकी, हेवेदावे हेच अधिक प्रभावी ठरले असून, काही ठिकाणी ही निवडणूक व्यक्तीकेंद्रीत झाल्याचे दिसून आले. एकूणच सर्वच राजकीय पक्षांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व असल्याचा दावा केला असला तरी खरे चित्र काही दिवसानंतर स्पष्ट होणार आहे. तर अनेक ठिकाणी सरपंच निवडीसाठी घोडेबाजार तेजीत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राजकारणावरील पकड ही गाव पातळीवरच्या निवडणुकीपासून सुरू होते. आपली पकड अधिक मजबूत व्हावी या दृष्टिने राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही सर्वशक्ती पणाला लावली होती. यातील काहींना यश आले तर काहींना अपयश. स्थानिक पातळीवरील निवडणूक ही पक्षविरहित होत असल्याचा अनुभव असला तरी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यासह अन्य पक्षांनी जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपल्या पक्षाचे वर्चस्व असल्याचा दावा केला आहे. निकालाचा अधिक तपशील हाती आल्यावरच या दाव्यातील सत्यता पुढे येऊ शकेल.