मटक्याचा गोरखधंदा परभणीत जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:40 AM2017-09-15T00:40:24+5:302017-09-15T00:40:24+5:30
जगण्याची भ्रांत हरविणारा आणि सर्वसामान्यांना देशोधडीला लावणारा मटका, जुगार परभणी शहरात राजरोसपणे सुरू असल्याची बाब ‘लोकमत’ने मंगळवार व गुरुवार असे दोन दिवस केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जगण्याची भ्रांत हरविणारा आणि सर्वसामान्यांना देशोधडीला लावणारा मटका, जुगार परभणी शहरात राजरोसपणे सुरू असल्याची बाब ‘लोकमत’ने मंगळवार व गुरुवार असे दोन दिवस केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आली़
जिल्ह्यात मटका, जुगार, दारू विक्री असे अनेक अवैध धंदे सुरू आहेत़ दिवसागणिक या वाम मार्गाच्या व्यवसायाची उलाढाल वाढत चालली आहे़ काही दिवसांपूर्वी शहरातील मोजक्याच ठिकाणी सुरू असलेला हा धंदा आता रस्त्या रस्त्यांवर आडोसा पाहून चालविला जात आहे़ त्यामुळे या धंद्याला पोलिसांचा वरदहस्त आहे की काय? अशी शंका घेण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली आहे़ अवैध धंदे बंद करण्याच्या मागण्या मागील काही दिवसांपासून जोर धरत आहेत़ त्यामुळे शहरात हे अवैध धंदे सुरू आहेत का? याची पाहणी करण्यासाठी ‘लोकमत’ने मंगळवारी व गुरुवारी असे दोन दिवस स्टिंग आॅपरेशन केले, तेव्हा हा व्यवसाय सर्रास सुरू असल्याची बाब स्पष्ट झाली़ मंगळवारी दुपारी १२़४० च्या सुमारास वांगी रोड भागात फेरफटका मारला तेव्हा एका पानटपरीवर मटका घेतला जात असल्याचे पहावयास मिळाले़ त्यानंतर १२़ ४५ च्या सुमारास हडको कॉर्नर येथे पाहणी केली असता, टपरी वजा दुकानामध्ये काही जण मटका घेताना दिसून आले़ त्यानंतर १२़५५ वाजता अंबिकानगर भागामध्ये एका कॉर्नरवर टपरीत मटका बुकी असल्याचे दिसून आले़
शहरातील जुना मोंढा परिसरात दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास दोन ते तीन ठिकाणी मटका घेतला असल्याचे पहावयास मिळाले. त्यातील एका ठिकाणी तर आॅनलाईन लॉटरी सेंटरच्या दुकानात बसून खुलेआम मटक्याच्या चिठ्ठ्या घेतल्या जात होत्या़ या तिन्ही दुकानातून सदर प्रतिनिधीने मटक्याच्या चिठ्ठ्या मिळविल्या. काद्राबाद प्लॉट परिसरातील कब्रस्तानजवळ एक इसम पानटपरीवर मटका घेताना आढळून आला. वीज वितरण कार्यालयाच्या समोर पानटपरीवर चलता-फिरता मटका सुरू होता़ नवा मोंढा परिसरात कमानीच्या समोर एका ठिकाणी मटका घेताना आढळून आले. एका दिवसाच्या पाहणीनंतर हा धंदा सातत्याने सुरू राहतो की नाही? याची पडताळणी करण्यासाठी पुन्हा गुरूवारीही ‘स्टिंग आॅपरेशन’ करण्यात आले. त्यामध्ये मंगळवारच्या स्थितीत तसुभरही बदल झाला नसल्याचे पहावयास मिळाले़ गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शहरातील स्टेडियम मार्केटपासून मटका बुकींचा शोध सुरू केला़ तेव्हा स्टेडियम परिसरातच दोन ठिकाणी मटका बुकी दिसून आल्या़ त्यापुढे कच्छी बाजार, अपना कॉर्नर ते शनि मंदिर रस्ता या भागात फेरफटका मारला तेव्हा काही ठिकाणी बंद दाराआड तर काही ठिकाणी पडदा टाकून मटका सुरू असल्याचे दिसून आले़ मटका चालवित असताना पोलिसांची कोणतीही भीती अथवा कारवाईची धास्ती नसल्याची बाबही यावेळी पहावयास मिळाली़ या पाहणीत प्रत्येक मटका बुकीवर ७ ते ८ जण मटका लावत खेळत असल्याचे दिसून आले़ विशेष म्हणजे दिवसभर या मटका बुकींवर गर्दी असते़ काही दिवसांपूर्वी चोरून लपून खेळला जाणारा हा मटका आता मात्र खुलेआम सुरू आहे़ धार रोड परिसर, गुलशना बाग कॉर्नर या भागातही मटका बुकी सुरू असल्याचे पहावयास मिळाले़ सकाळपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या मटका बुकी चालतात़ ओपन, क्लोज अशा दोन्ही वेळेला या भागात नागरिकांची गर्दी पहावयास मिळते़ शहरात खुलेआम मटका सुरू असल्याने मटका खेळणाºयांची संख्याही वाढत चालली आहे़