वाळूज महानगरवासीयांचा मनपाला प्रखर विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:02 AM2021-02-26T04:02:21+5:302021-02-26T04:02:21+5:30
वाळूज महानगर : मनपा हद्दीत समाविष्ट होण्यास वाळूज महानगरवासीयांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. मनपामुळे ग्रामपंचायती व जि.प., पं. स. ...
वाळूज महानगर : मनपा हद्दीत समाविष्ट होण्यास वाळूज महानगरवासीयांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. मनपामुळे ग्रामपंचायती व जि.प., पं. स. पदाधिकाऱ्यांच्या अधिकारावर गदा येणार असून वाढीव कराच्या भीतीमुळे स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी मनपात समाविष्ट होण्यास कडाडून विरोध केला आहे. यासंदर्भात कृती समितीच्या माध्यमातून लढा उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
उद्योगनगरीतील रांजणगाव, वडगाव-बजाजनगर, पंढरपूर, पाटोदा, तीसगाव, गोलवाडी, वाळूज आदी गावांचा मनपा हद्दीत समावेश करण्याचा निर्णय शासनस्तरावरून सुरू झाला आहे. विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांना विश्वासात न घेता परस्पर या भागाचा मनपा हद्दीत समावेश प्रस्ताव तयार केला जात आहे. मनपामुळे या भागातील गरीब कामगार व मध्यमवर्गीयांना वाढीव कराचा भुर्दंड सोसावा लागण्याची भीतीही आहे. आजघडीला शहरात आठ दिवसांआड पाणीपुरवठा सुरू असून विविध मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी शहरवासीयांना कायम संघर्ष करावा लागत आहे. वाळूज महानगर परिसराचा मनपा हद्दीत समावेश केल्यास या भागातील नागरिकांना किमान मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याची भीतीही व्यक्त आहे. औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या शोधात आलेल्या अनेकांनी शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमणे करून कच्ची-पक्की घरे बांधली आहेत. मनपामुळे अतिक्रमणावर हातोडा पडू शकतो. या परिसरात विकास कामासाठी स्थानिक ग्रामपंचायतींना शासनाकडून विविध योजनांतून निधी मिळत असतो. औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांकडून मिळणाऱ्या करामुळे गावातील नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. सिडको व एमआयडीसी प्रशासनाकडून या परिसरात रस्ते, ड्रेनेज, पिण्याचे पाणी आदी मूलभूत सुविधा पुरविल्या जातात. मनपामुळे ग्रामपंचायतीचे अस्तित्व संपणार आहे. नागरिकांना सुविधांसाठी कायम मनपा प्रशासनाशी संघर्ष करावा लागण्याची भीती वाळूज महानगरवासीयांतून वर्तविली जात आहे.
प्रतिक्रिया...
मनपाला कडाडून विरोध करणार
वडगाव-बजाजनगरात बहुतांश गरीब व मध्यमवर्गीय कामगार वास्तव्यास आहेत. मनपामुळे एमआयडीसी व ग्रामपंचायतीला विकास कामे करता येणार नसल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे. मनपा हद्दीत समावेश करण्यात या भागातील नागरिकांचा प्रखर विरोध राहणार आहे.
फोटो - सचिन गरड, सरपंच, वडगाव-बजाजनगर
--------------------
कृती समितीच्या माध्यमातून लढा उभारणार
मनपामुळे वाळूज उद्योगनगरीतील कामगार, व्यावसायिक व नागरिकांना विविध करांचा वाढीव भुर्दंड सहन करावा लागेल. स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांना विश्वासात न घेता परस्पर हा निर्णय घेण्यात येत आहे. कृती समितीच्या माध्यमातून लवकरच लढा उभारण्यात येणार आहे.
फोटो क्रमांक- दीपड बडे (पं.स. दीपक बडे, रांजणगाव)
--------------------
पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर स्वतंत्र मनपा करा
औरंगाबाद शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून, मनपाला शहरवासीयांना सुविधा पुरविताना मोठी कसरत करावी लागते. वाळूज महानगरातील गावांचा मनपात समावेश केल्यास विकास कामाचा बोजा वाढणार आहे. शासनाने पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर वाळूज महानगर ही स्वतंत्र मनपा करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा केला जाणार आहे.
फोटो - उषा हिवाळे, जि. प. सदस्या, रांजणगाव
--------------------------
स्थानिक लोकप्रतिनिधीच्या अधिकारावर गदा येणार
मनपामुळे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच जि.प. व पं.स. सदस्यांच्या अधिकारावर गदा येणार आहे. परिणामी विकास कामे रखडली जाणार असून, याचा फटका नागरिकांना सहन करावा लागणार आहे.
फोटो - सईदाबी पाठण, सरपंच, वाळूज
---------------
लघुउद्योगांवर विपरीत परिणाम होणार
चिकलठाणा औद्योगिक क्षेत्राचा मनपात समावेश केल्यामुळे या परिसरातील उद्योजकांना सुविधांसाठी सतत मनपासोबत संघर्ष करावा लागत आहे. मनपाकडून उद्योजकांना मूलभूत सुविधा पुरविण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे चिकलठाण परिसरातील अनेक उद्योग बंद पडून कामगार विस्थापित झाले आहेत. तशीच स्थिती वाळूज उद्योगनगरीतील लघुउद्योजकांची होऊ शकते.
फोटो- अर्जुन आदमाने, लघुउद्योजक, वाळूज एमआयडीसी
----------------------