मराठवाड्यात शिंदेसेनेची जोरदार कामगिरी; चार जिल्ह्यांत स्ट्राइक रेट १०० टक्के

By नजीर शेख | Published: November 27, 2024 11:32 AM2024-11-27T11:32:49+5:302024-11-27T11:33:21+5:30

उमेदवारी दिलेल्या आठ आमदारांपैकी सात विजयी; सहा नवीन आमदार

Strong performance of Shindesena in Marathwada; The strike rate in four districts is 100 percent | मराठवाड्यात शिंदेसेनेची जोरदार कामगिरी; चार जिल्ह्यांत स्ट्राइक रेट १०० टक्के

मराठवाड्यात शिंदेसेनेची जोरदार कामगिरी; चार जिल्ह्यांत स्ट्राइक रेट १०० टक्के

छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील ४६ मतदारसंघापैकी १६ जागा लढविणाऱ्या शिंदेसेनेचा केवळ एक आमदार पराभूत झाला आहे. उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांचा उद्धवसेनेचे प्रवीण स्वामी यांनी पराभव केला आहे. शिंदेसेनेचे मराठवाड्यात १३ आमदार निवडून आले आहेत. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि हिंगोली या चार जिल्ह्यांत शिंदेसेनेचा स्ट्राइक रेट १०० टक्के राहिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांपूर्वी केलेल्या बंडात सहभागी शिवसेनेचे ४० आमदार सहभागी झाले होते. शिंदे यांना साथ देणाऱ्यांपैकी एकही आमदार पडणार नाही, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली होती. शिंदेसेनेने लढविलेल्या १६ जागांमध्ये गुवाहाटी येथे त्यांच्यासोबत असणाऱ्या मराठवाड्यातील आठ आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळाली होती. आठपैकी सात आमदार विजयी झाले. एकजण पराभूत झाला. आठ मतदारसंघांत शिंदेसेनेने नवीन उमेदवार दिले होते. नवीन उमेदवारी दिलेल्यांपैकी सहा जण विजयी झाले. यामध्ये संजना जाधव (कन्नड) या महिला आमदाराचाही समावेश आहे. बंडाच्या वेळी साथ दिलेले पैठणचे आमदार संदीपान भुमरे हे खासदार झाल्याने तिथे त्यांचे पुत्र विलास भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. ते विजयी झाले. परभणी, धाराशिव आणि उमरगा या तीन जागा शिंदेसेनेने गमावल्या. महायुतीमध्ये लातूर आणि बीड जिल्ह्यात शिंदेसेनेने एकही उमेदवार दिलेला नव्हता.

विजयी झालेले आमदार
संजय शिरसाट (औरंगाबाद पश्चिम), अब्दुल सत्तार (सिल्लोड), प्रदीप जैस्वाल (औरंगाबाद मध्य), रमेश बोरनारे (वैजापूर), बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर), संतोष बांगर (कळमनुरी), तानाजी सावंत (परांडा). 

नवीन निवडून आलेले आमदार
विलास भुमरे (पैठण), संजना जाधव (कन्नड), अर्जुन खोतकर (जालना), हिकमत उढाण (घनसावंगी), बाबूराव कदम कोहळीकर (हदगाव), आनंद तिडके (नांदेड दक्षिण).

शिंदेसेनेचे निवडून आलेले उमेदवार
जिल्हा                         विजयी

छत्रपती संभाजीनगर : ६
जालना :                         २
बीड :                         ०
धाराशिव :                         १
लातूर :                         ०
हिंगोली :                         १
परभणी :                         १
नांदेड :                         ३
एकूण :                         १३

Web Title: Strong performance of Shindesena in Marathwada; The strike rate in four districts is 100 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.