मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:48 AM2019-05-24T00:48:05+5:302019-05-24T00:48:19+5:30
लोकसभा मतदारसंघाचा मतमोजणी निकाल ऐकण्यासाठी येणाऱ्या विविध उमेदवारांच्या समर्थकांत वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी मतमोजणी केंद्राबाहेर तगडा बंदोबस्त ठेवला होता.
औरंगाबाद : लोकसभा मतदारसंघाचा मतमोजणी निकाल ऐकण्यासाठी येणाऱ्या विविध उमेदवारांच्या समर्थकांत वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी मतमोजणी केंद्राबाहेर तगडा बंदोबस्त ठेवला होता. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिवसभरात तीन वेळा मतमोजणी केंद्रात येऊन पाहणी केली तर उपायुक्त डॉ.राहुल खाडे हे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह स्वत: दिवसभर मतमोजणी केंद्राच्या आवारात ठाण मांडून होते.
चिकलठाणा एमआयडीसीतील मेल्ट्रॉन कंपनीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गुरुवारी दिवसभर सुरू होती. एक महिन्यापासून मतदान संपले तेव्हापासून मेल्ट्रॉन निवडणूक विभागाने ईव्हीएम ताब्यात घेतले होते. मेल्ट्रॉनमध्ये ही मतदान यंत्रे ठेवण्यात आली. तेव्हापासून तेथे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. तेव्हापासून पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद हे दररोज नियमित मेल्ट्रॉनमधील स्ट्राँग रूमच्या सुरक्षेचा आढावा घेऊन पाहणी करीत.
ही निवडणूक अटीतटीची झाल्याचे समोर आल्यापासून मतमोजणी शांततेत व्हावी, याकरिता पोलीस यंत्रणा अधिक दक्ष झाली होती. मतमोजणीस्थळी पोलीस उपायुक्त डॉ.राहुल खाडे यांच्यासह तीन सहायक पोलीस आयुक्त, गुणाजी सावंत, दहा पोलीस निरीक्षक, ३० फौजदार, २०० पोलीस कर्मचारी आणि ६० महिला पोलीस, वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह केंद्रीय पोलीस दलाचे जवान तैनात केले होते. मतमोजणी केंद्राबाहेर दोन उमेदवारांच्या समर्थकांत घोषणाबाजीनंतर झालेल्या दगडफेकीची घटना वगळता मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली.
निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर धूत हॉस्पिटल चौक आणि संजयनगर येथे रस्त्यावर उभे राहून काही कार्यकर्ते जल्लोष करीत होते. यावेळी कार्यकर्ते शिवसेनेच्या चारचाकी वाहनांसमोर जोरदार घोषणाबाजी करून आदळआपट करीत होते. उत्साही कार्यकर्त्यांनी वाहने अडविल्याचे कळताच वाहतूक पोलीस आणि पोलिसांनी रस्त्यावर जल्लोष करणाºयांना पिटाळून लावले.