जिल्हा परिषद इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल अभियंत्यांच्या घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 07:03 PM2019-08-22T19:03:15+5:302019-08-22T19:05:38+5:30
ऐतिहासिक जिल्हा परिषद इमारतीच्या छताला तडा
औरंगाबाद : शंभर वर्षापेक्षा अधिक जुन्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या छताला मोठा तडा गेला आहे. इमारतीमध्ये वावरणे धोकादायक बनल्याचे वित्त विभागातील अधिकाऱ्यांच्या दालनात सिलिंग छत कोसळल्यामुळे स्पष्ट झाले. या इमारतीचे मागील वर्षी सप्टेंबर महिन्यातच स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. मात्र याविषयीचा अहवाल अभियंत्याच्या घरी धुळ खात पडून असल्याची माहिती समोर आली.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेची इमारत आहे. याठिकाणाहून जिल्ह्याचा कारभार करण्यात येतो. या इमारतीला ऐतिहासिक वारसा लाभलेला असून, सततचा अती वापर आणि निकृष्ट डागडूजींमुळे इमारतीची अवस्था जिर्ण बनली आहे. मागील आठवड्यात समाज कल्याण सभापती धनराज बेडवाल यांच्या दालन गळू लागल्याने, स्लॅबच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम सुरू असतानाच बसलेल्या हलक्या हादऱ्यांनी त्यांच्या दालनातील सिलिंगचा काही भाग अचानक कोसळला होता. त्यावेळी दालनात जात असताना महिला समाजकल्याण निरीक्षक थोडक्यात बचावले.
मंगळवारी वित्त विभागाच्या लेखाधिकारी साधना बांगर यांच्या दालनातील सिलिंगचा काही भाग कोसळला. त्यांनी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सूचना देऊन दुरुस्तीचे करण्यास सांगितले. तेव्हा अभियंत्यांनी पाणी झिरपण्याचे कारण शोधण्यासाठी खोदकाम केले असता, स्लॅबला भेगा पडल्याचे दिसून आले. गेल्या अनेक वर्षात स्लॅबची दुरुस्ती झाली असून, थरावर थर टाकलेले आहेत. हे थर काढल्यानंतर मुख्य स्लॅबवरील भेगा दिसून आल्या. विशेष म्हणजे दोन-तीन ठिकाणी स्लॅब खचला असल्याचे दिसून आले.
या घटनेनंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी अभियंता व्ही.एस. डहाळे यांना बोलावून स्ट्रक्चरल आॅडिटबाबत विचारणा केली. तेव्हा डहाळे यांनी सप्टेंबर २०१८ मध्येच आॅडिट केल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे तात्कालिन अभियंता अतुल चव्हाण यांच्याकडून हे आॅडिट करून घेण्यात आले होते. या रिपोर्टमध्ये काय सांगितले आहे, अशी विचारणा केली असता, डहाळे यांना तपशील काही देता आला नाही. तेव्हा या आॅडिटचा अहवाल प्रसारमाध्यमांना उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. तेव्हा हा अहवाल घरी ठेवण्यात आल्याचे उत्तर डहाळे यांनी दिले. त्यामुळे अभियंत्यांच्या घरी कोणकोणत्या फाईल ‘सुरक्षित’ ठेवण्यात आल्या आहेत. असा प्रश्न उपस्थित झाला आहे.