तांत्रिक अडचणीने विद्यार्थ्यांची ‘सत्त्व’ परीक्षा; त्रयस्थ यंत्रणेला विद्यापीठाने दिली तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 07:52 PM2020-10-17T19:52:38+5:302020-10-17T19:52:56+5:30
पहिल्या दिवसापासूनच ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतींच्या परीक्षांचा गोंधळ उडाला.
औरंगाबाद : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्र परीक्षेत उडालेला तांत्रिक गोंधळ थांबणार आहे की नाही. तुमच्यामुळे विद्यापीठाची जनसामान्यांमध्ये बदनामी होत आहे. यापुढे तांत्रिक अडचणीची कारणे ऐकून घेतली जाणार नाहीत, या शब्दांत परीक्षा घेणाऱ्या त्रयस्थ यंत्रणेला विद्यापीठ प्रशासनाने चांगलेच खडसावले. तरीही शुक्रवारी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला; पण त्याचे प्रमाण कमी होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ९ ऑक्टोबरपासून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांना सुरुवात झाली. पहिल्या दिवसापासूनच ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतींच्या परीक्षांचा गोंधळ उडाला. अनेक विद्यार्थ्यांना पेपरची लिंक ओपन झाली नाही. लिंक ओपन झाली, तर दुसऱ्याच विषयाचा पेपर स्क्रीनवर यायचा. सकाळच्या सत्रात ६० प्रश्न, तर दुपारच्या सत्रात ३० प्रश्न, अनेक प्रश्न तसेच पर्यायी उत्तरे चुकीची, कधी कधी रात्री उशिरापर्यंत ऑफलाईन पेपर डाऊनलोड होत नसत. या सर्व प्रकारांमुळे परीक्षार्थी हतबल झाले आहेत.
दरम्यान, विद्यापीठाने पहिल्यांदाच ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन केले असून, ही परीक्षा त्रयस्थ यंत्रणेमार्फत घेतली जात आहे. विद्यापीठ प्रशासनाने या यंत्रणेला शुक्रवारी चांगलीच तंबी दिली असून, यापुढे कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या नाही पाहिजेत. गरज पडल्यास सर्व्हर हाताळण्यासाठी मनुष्यबळ वाढवा, अशा सूचनाही केल्या. त्यानुसार सदरील यंत्रणेने मनुष्यबळ वाढवून येणाऱ्या तांत्रिक अडचणीही सुधारण्याचा प्रयत्न केला. तरीही आज काही प्रमाणात लिंक उशिरा ओपन होणे, ऑफलाईन पेपर लवकर डाऊनलोड न होणे, अशा तक्रारी आल्या.
विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही
युवा सेनेचे उपसचिव तथा माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे, भारतीय विद्यार्थी सेनेचे डॉ. तुकाराम सराफ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ, तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रकाश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली संकेत कांबळे, रोहित जोगदंड, कपिल वानखेडे, राहुल कांबळे आदींनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेतली. परीक्षेतील गोंधळ थांबवाविद्यापीठाच्या चुकीमुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे, याची दखल घ्यावी लागेल; अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असा इशारा दिला. तेव्हा कुलगुरू डॉ. येवले म्हणाले की, कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहाणार नाही. एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ देणार नाही, याची मी खात्री देतो.