हॉलतिकीटसाठी विद्यार्थ्यांचे हाल; ५ विधि महाविद्यालयांना विद्यापीठाची कारणे दाखवा नोटीस

By योगेश पायघन | Published: January 18, 2023 05:58 PM2023-01-18T17:58:37+5:302023-01-18T18:01:08+5:30

विद्यार्थ्यांना हाॅलतिकीट न मिळाल्याने पीआरएन नंबरवर परीक्षा देण्याची नामुष्की

struggle of students for hall tickets; Show cause notices to five law colleges by Dr.BAMU | हॉलतिकीटसाठी विद्यार्थ्यांचे हाल; ५ विधि महाविद्यालयांना विद्यापीठाची कारणे दाखवा नोटीस

हॉलतिकीटसाठी विद्यार्थ्यांचे हाल; ५ विधि महाविद्यालयांना विद्यापीठाची कारणे दाखवा नोटीस

googlenewsNext

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सत्र परीक्षांत महाविद्यालयांकडून परीक्षा शुल्क वेळेत न भरल्याने विद्यार्थ्यांना पीएनआर नंबरवर परीक्षा देण्याची नामुश्की ओढावली. त्यामुळे वेळेत शुल्क न भरणाऱ्या पाच विधी महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावत आहोत. असे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी बुधवारी सांगितले.

४ जिल्ह्यांतील १२५ केंद्रावर ९ हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत. एम.ए, एम.एस्सी, एम.कॉम; तसेच अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम असे नऊ हजार विद्यार्थी सत्र परीक्षेला बसलेले आहेत. मंगळवारी परीक्षा सुरू होताच पहिल्याच दिवशी हाॅलतिकीट, परीक्षा केंद्रावरील असुविधांमुळे काही ठिकाणी गोंधळ उडाला. एका केंद्रावर ‘लाॅ’ची परीक्षा देण्यासाठी काही परीक्षार्थी चक्क बरमुडा, नाइट पँटवर आले होते. याची विद्यापीठ प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. 

१६ नोव्हेंबरपर्यंत परीक्षा शुल्क भरण्यासाठी मुदत होती. तरीही ६ जानेवारीपर्यंत काही महाविद्यालयांनी शुल्क परीक्षा विभागाकडे न भरल्याने विद्यार्थ्यांना वेळेत हाॅलतिकीट मिळू शकले नाही. शनिवार, रविवारची सुटी आणि सोमवारी काही बॅंकांचा संप यात विद्यार्थ्यांचे शुल्क जमा झाले, त्यांना सोमवारी सायंकाळपर्यंत हाॅलतिकीट ऑनलाईन पाठवले. मात्र, महाविद्यालयाचा सही शिक्का घेण्यास विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत ताटकळावे लागले. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीत घेण्यासाठी दिलेल्या वेळापत्रकात आवश्यक कामे पूर्ण करण्यावरही महाविद्यालयांनी लक्ष द्यावे. असेही कुलगुरूंनी महाविद्यालयांना ठणकावले आहे.

थेट परीक्षेला आले, त्यांना अडचणी जास्त
साडेतीन हजार विद्यार्थी विधि अभ्यासक्रमाचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना हाॅलतिकीट मिळाले नाही. त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना पीआरएन नंबरवर परीक्षा देऊ देण्याची मुभा देण्यात आली आहे. असे विद्यार्थी परीक्षेच्या दुसऱ्या दिवशीही परीक्षा केंद्रावर दिसून आले. नियमित वर्ग करणाऱ्यांना विद्यार्थ्यांना अडचणी आल्या नाहीत. त्यांनी वेळेवर अर्ज भरले. त्यांना प्रवेशपत्रही मिळाले. मात्र, नसून थेट परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रासंबंधीच्या अडचणी आल्याचे महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सांगितले.

या महाविद्यालयांना कारणे दाखवा...
स्व. आमदार वसंतरावजी काळे विधि महाविद्यालय, माणिकचंद पहाडे विधि महाविद्यालय, व्ही. एन. पाटील विधि महाविद्यालयासह बीड येथील एमएसपी मंडळाच्या विधि महाविद्यालय आणि उस्मानाबाद येथील विधि महाविद्यालयास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. गणेश मंझा यांनी सांगितले.

Web Title: struggle of students for hall tickets; Show cause notices to five law colleges by Dr.BAMU

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.