एसटीच्या १८ % भाडेवाढीतून औरंगाबाद विभागाला दररोज मिळणार १३ लाखाचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 03:23 PM2018-06-07T15:23:32+5:302018-06-07T15:25:12+5:30
डिझेलचे वाढते दर आणि एसटी कामगारांची करण्यात आलेली पगारवाढ या पार्श्वभूमीवर एसटीने तब्बल १८ टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला.
औरंगाबाद : डिझेलचे वाढते दर आणि एसटी कामगारांची करण्यात आलेली पगारवाढ या पार्श्वभूमीवर एसटीने तब्बल १८ टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला. ही दरवाढ १५ जूनपासून लागू केली जाणार असून, या निर्णयामुळे औरंगाबाद विभागाचा विचार करता महिन्याला प्रवाशांना ३ कोटी ८० लाख रुपयांचा भुर्दंड बसणार आहे, तर एसटी महामंडळाला दररोज १३ लाख ४० हजार रुपयांचे वाढीव उत्पन्न मिळणार आहे.
गत वर्षभरात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने देशातही डिझेलचे दर जवळपास ११ रुपये प्रति लिटरने वाढले आहेत. या वाढीव दरामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधींचा फटका बसला आहे. त्यातच महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना काही दिवसांपूर्वीच वेतनवाढ देण्यात आली, याचाही एसटीच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी महामंडळाने प्रवासी भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ १५ जूनपासून लागू केली जाणार आहे. या दरवाढीमुळे प्रवाशांना मात्र भुर्दंड बसणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या औरंगाबाद विभागात मध्यवर्ती बसस्थानकासह आठ आगार आहेत. विभागाकडे साधी, हिरकणी, शिवनेरी, शीतल, शिवशाही, शहर बस आणि यशवंती, अशा ६३२ बसेस आहेत. या बसेसच्या दररोज २ हजार ५७१ फेऱ्या होतात, तर या बसेस दररोज १ लाख ९१ हजार किलोमीटरचा प्रवास करतात. औरंगाबाद विभागाला या सेवेतून दररोज जवळपास ६६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. या उत्पन्नाचा विचार करता महिन्याला १९ कोटी ८० लाख, तर वर्षाला महामंडळाच्या या विभागाला २३७ कोटी ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. १८ टक्के दरवाढ लागू झाल्यानंतर दररोज एसटीने प्रवास करणाऱ्यांना १३ लाख ४० हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे, तर वर्षाला ३ कोटी ७० लाख रुपयांचे वाढीव उत्पन्न महामंडळाला मिळणार आहे.
अधिक माहिती नाही
एसटी महामंडळाकडून १८ टक्के भाडेवाढ जाहीर झाल्याची अधिकृत माहिती आपल्याकडे नाही. वरिष्ठांकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच यावर अधिक बोलणे उचित ठरेल.
-प्रशांत भुसारी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, औरंगाबाद