विवाहितेवर अत्याचार करणा-यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 08:44 PM2019-01-12T20:44:58+5:302019-01-12T21:15:59+5:30
महापालिकेने पाठविलेली घर पाडण्याची नोटीस रद्द करून देण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार करणाºया नराधमाचा शोध घेण्यात बेगमपुरा पोलिसांना यश आले. केवळ आरोपीच्या मोबाईल क्रमांक आणि जाधव एवढेच नाव पीडितेला माहिती होते.
औरंगाबाद : महापालिकेने पाठविलेली घर पाडण्याची नोटीस रद्द करून देण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार करणाºया नराधमाचा शोध घेण्यात बेगमपुरा पोलिसांना यश आले. केवळ आरोपीच्या मोबाईल क्रमांक आणि जाधव एवढेच नाव पीडितेला माहिती होते.
रानबा उर्फ ज्ञानोबा वामनराव जाधव (५७)असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जाधव हा भूजल सर्वेक्षण उपसंचालक कार्यालयात वाहनचालकपदी कार्यरत आहे. तक्रारदार पीडितेच्या वडिलांच्या नावे जयसिंगपुरा येथे घर आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने त्यांना नोटीस पाठवून घराचे बांधकाम विना परवाना केले असल्याने कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे कोणीतरी पीडितेला घराच्या क्षेत्रफळाची भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून घ्या,असे सांगितले होते. पीडिता त्या कार्यालयाचा शोध घेत असताना आरोपी जाधव तिला भेटला होता. त्यावेळी त्याने तिला भूमीअभिलेख विभागाचे कार्यालयाचा पत्ता सांगितला आणि काही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क साधा असे म्हणून एका कागदावर जाधव असे नाव आणि मोबाईल क्रमांक लिहून दिला.
मात्र, त्यानंतरही तिला ते कार्यालय सापडले नव्हते. दुसºया दिवशी पीडितेने त्याच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांच्या जागेविषयी त्यांच्याविरोधात निकाल लागल्याचे कळविले. तेव्हा त्याने आपण त्याविरोधात दुसरी केस करू असे म्हणून २६ डिसेंबर रोजी कार्यालय संपल्यानंतर मी तुमच्या घरी येतो, तुम्ही कागदपत्रे काढून ठेवा,असे म्हणाला.तेव्हा वडिल घरी नसल्याने तुम्ही येऊ नका,असे पीडितेने त्याला सांगितले तेव्हा मी दोन मिनिटासाठी येऊन जातो,असे जाधव म्हणाला. २६ रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास पीडितेचे वडील आणि बहीण हे रेल्वेस्टेशन येथे गेले होते. त्याचवेळी जाधव तिच्या घरी आला आणि पीडिता घरात एकटीच असल्याची संधी साधून तिला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार करून निघून गेला.
याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. घटनेपासून आरोपी जाधव पसार झाला होता. पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विनोद बदक, कर्मचारी राठोड, गवळी,भोज, सय्यद शकील आणि देवा सुर्यवंशी यांनी तपास करून आरोपी जाधवला बेड्या ठोकल्या.