विद्यापीठाच्या परीक्षेत विद्यार्थ्याने काढली छेड; तक्रारीनंतर धक्काबुकी करताच विद्यार्थिनीने दिला चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 07:41 PM2019-05-13T19:41:17+5:302019-05-13T19:43:01+5:30
छेडछाडीची तक्रार केल्याने विद्यार्थिनीस केली धक्काबुकी
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात बॅचलर आॅफ परफॉर्मिंग आर्टस्ची परीक्षा सुरू असताना एका विद्यार्थ्याने विद्यार्थिनीची छेड काढली. याप्रकरणी विद्यार्थिनीने पर्यवेक्षकांकडे तक्रार केल्यामुळे संतप्त विद्यार्थ्याने सदरील विद्यार्थिनीला धक्काबुक्की केली असता, तिने विद्यार्थ्याच्या थेट कानशिलात लगावली. या प्रकरणाची सदरील विद्यार्थिनी सोमवारी कुलगुरूंकडे तक्रार करणार आहे.
विद्यापीठात द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा नाट्यशास्त्र विषयाचा पेपर रविवारी (१२ मे) दुपारी झाला. या परीक्षेत एका विद्यार्थ्याने विद्यार्थिनीची छेड काढली. याप्रकरणी संबंधित विद्यार्थिनीने पर्यवेक्षकाकडे तक्रार केली. ही तक्रार केल्याचा राग मनात धरून विद्यार्थ्याने विद्यार्थिनीला धक्काबुक्की केली. तसेच मारहाण करण्याचा प्रयत्न केला. बचावासाठी विद्यार्थिनीने विद्यार्थ्याच्या कानशिलात भडकावली. त्यामुळे वाद आणखी वाढला आणि परीक्षेत व्यत्यय निर्माण झाला. हा विद्यार्थी नेहमी माझी छेड काढतो. यापूर्वी समज दिल्यानंतरही हा प्रकार थांबत नसल्याचे विद्यार्थिनीने सांगितले. तर हिला ताबडतोब परीक्षा हॉलच्या बाहेर काढा, असा दम विद्यार्थ्याने भरला. पर्यवेक्षक प्रा. स्मिता साबळे आणि प्रा. सुनील टाक यांनी मध्यस्थी करून वाद मिटविला. तसेच त्यांनी विद्यार्थिनीला परीक्षा पेपर लिहिण्यास सांगितले.
या प्रकारामुळे मी घाबरले असून, माझे काही बरे-वाईट झाल्यास विद्यार्थी जबाबदार असेल, असे विद्यार्थिनी सांगत होती. तिने अत्यंत तणावात पेपर सोडविल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान रविवार असल्यामुळे विभागात उपस्थिती नव्हती. त्यामुळे नेमका काय प्रकार घडला ते माहिती नाही. याबाबत सोमवारी सविस्तर माहिती घेतो, असे नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर यांनी सांगितले.