शिक्षकाने मारल्याने विद्यार्थ्यास बहिरेपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:50 AM2017-09-26T00:50:27+5:302017-09-26T00:50:27+5:30
बुन इंग्लिश स्कूलमध्ये नववीत शिकणा-या विद्यार्थ्याला वर्गात गोंधळ करीत असल्याच्या कारणावरून शिक्षकाने त्याच्या कानशिलात लगावली. विद्यार्थ्याच्या कानाचा पडदा फाटून त्यास बहिरेपणा आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जटवाडा रोडवरील बुन इंग्लिश स्कूलमध्ये नववीत शिकणाºया विद्यार्थ्याला वर्गात गोंधळ करीत असल्याच्या कारणावरून शिक्षकाने त्याच्या कानशिलात लगावली. या घटनेत विद्यार्थ्याच्या कानाचा पडदा फाटून त्यास बहिरेपणा आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध २४ सप्टेंबर रोजी बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
अब्दुल कदीर अब्दुल जब्बार (४४, रा. फरहतनगर, जटवाडा रोड) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. बेगमपुरा पोलिसांनी सांगितले की, जटवाडा रोडवरील फरहतनगर येथे बुन इंग्लिश स्कूल आहे. या शाळेत तक्रारदार शेख रफिक शेख अब्दुल रशीद यांचा मुलगा शेख हुजेफ (१५) हा नवव्या वर्गात शिकतो.
२२ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास आरोपी अब्दुल कदीर हे शिक्षक अरबी भाषा शिकवीत होते. यावेळी काही मुले वर्गात गोंधळ करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अब्दुल कदीर यांनी त्यांच्यापैकी हुजेफला बोलावून सर्व विद्यार्थ्यांसमोर त्याच्या कानाखाली मारली. गंभीर दुखापत झाल्याने हुजेफला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या कानाला गंभीर दुखापत झाल्याने त्यास बहिरेपणा आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकाराने शेख रफिक संतप्त झाले. त्यांनी बेगमपुरा पोलीस ठाणे गाठून शिक्षकाने केलेल्या मारहाणीमुळे मुलाला बहिरेपणा आल्याची तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक सरवर शेख तपास करीत आहेत.
शिक्षिकेने ढकलल्यामुळे विद्यार्थ्याच्या डोक्याला कोच
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : इयत्ता चौथीमध्ये शिकणाºया विद्यार्थ्याला शिक्षिकेने हाताला धरून ढकलून दिल्याने दरवाजावर डोके आदळून त्याला कोच पडली. सिडको येथील सेंट झेविअर हायस्कूलमध्ये सोमवारी (दि.२५) ही घटना घडली. याची विचारणा करण्यास गेलेल्या पालकांना शाळेने प्रतिसाद दिला नाही.
साई संतोष हुजदार (९) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, सोमवारी दुपारी शाळा सुटल्यावर तो मित्राला पेन मागत होता. यावेळी वर्गात केवळ तीन विद्यार्थी व एक शिक्षिका होत्या. साई पेन मागत असताना त्या शिक्षिकेने त्याच्या डाव्या हाताला धरून बाहेर ढकलले. यामुळे त्याचे डोके दरवाजाच्या हँडलवर जाऊन आदळले. डोक्याला जेथे मार लागला तेथेच शिक्षिकेने पुन्हा चापट मारून त्याला बाहेर काढले. ‘माझ्या वाढदिवसाला गिफ्ट मिळालेला पेन मी मागत होतो तेव्हा टीचरने मला ढकलून दिले. ते कोणाचीच कदर करत नाही,’ असे विद्यार्थ्याने ‘लोकमत’ला सांगितले.
घरी आल्यावर घाबरलेल्या साईने आईला सर्व प्रकार सांगितला. आईने लगेच वडिलांना फोन करून साईला दवाखान्यात नेले. ‘त्याच्या डोक्यातून रक्त आले तरी शाळेने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. साधा प्रथमोपचारदेखील केला नाहीत. आम्ही कोणाच्या भरोशावर विद्यार्थ्यांना शाळेत सोडावे? असा संतापजनक सवाल आई शीतल हुजदार यांनी केला. दुपारी पालक शाळेत आले असता त्यांना दुसºया दिवशी येण्यास सांगितले. तोपर्यंत शाळा प्रशासनाला याबाबत काहीच माहिती नव्हती. ‘शाळेकडून आम्हाला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी साधी चौकशीदेखील केली नाही. केवळ ‘उद्या सकाळी येऊन भेटा’ असे शाळेचे सुरक्षारक्षक आणि शिपाई आम्हाला सांगत होते, असे वडील संतोष हुजदार यांनी सांगितले.