नदीवर आंघोळीस गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:14 AM2017-08-28T00:14:56+5:302017-08-28T00:14:56+5:30
गावाशेजारील नदीत आंघोळीस गेलेल्या एका विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला़ तर अन्य मुलांचे प्राण एका युवकाच्या सतर्कतेमुळे वाचले़ ही घटना रविवारी दुपारी बोधडी बु़ (ता़ किनवट) येथे घडली़
लोकमत न्यूज नेटवर्क
बोधडी (जि़नांदेड) : गावाशेजारील नदीत आंघोळीस गेलेल्या एका विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला़ तर अन्य मुलांचे प्राण एका युवकाच्या सतर्कतेमुळे वाचले़ ही घटना रविवारी दुपारी बोधडी बु़ (ता़ किनवट) येथे घडली़
बोधडी बु़ येथील अनिकेत दत्ता गायकवाड (वय १३, इयत्ता ६ वी), श्याम गोविंद केंद्रे (वय १७, इयत्ता ८ वी), आदित्य संदीप पडघणे (वय १३) हे जिल्हा परिषद शाळेतील तिघेजण नदीमध्ये आंघोळीस गेले़ पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत गेले़
मुले पाण्यात बुडत असल्याची बाब नदीपात्रात आंघोळ करीत असलेल्या जीवन सुभाष शिंदे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तत्काळ मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला़
यावेळी त्यांना श्याम गोविंद केंद्रे आणि आदित्य संदीप पडघणे या दोघांना वाचविण्यात यश आले, परंतु अनिकेत गायकवाड हाती लागला नाही़
दरम्यान, जवळच असलेल्या वस्तीतील सुभाष पाटील, श्रीकांत मुंडे, किरण डोंगरे, संतोष सोनकांबळे, राजू कांबळे, अजय काळभाडे, मधुकर गवळे, मारोती शिनगारे, उपसरपंच यांनी अनिकेतचा शोध घेण्याचा प्रयत्न केले़ परंतु, त्याचा शोध लागला नाही़
यानंतर भोई समाजातील उत्तम शिरफुले, श्रीकांत शिरफुले, माधव शिरफुले यांनी अनिकेतचा मृतदेह पाण्यातून शोधून काढला़
मृतदेह काढण्यास जवळपास तासभर लागल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती़
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे़ तर दोन विद्यार्थ्यांचे जीव वाचविणाºया जीवन शिंदे या युवकाचे कौतुक होत आहे़