घाटीतील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या माथी फर्निचरशिवाय वसतिगृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 06:31 PM2018-05-07T18:31:29+5:302018-05-07T18:50:29+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) फर्निचरशिवाय वसतिगृह पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी निवासी डॉक्टरांकडून लेखी हमीपत्र घेण्यात येत आहे.
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) फर्निचरशिवाय वसतिगृह पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी निवासी डॉक्टरांकडून लेखी हमीपत्र घेण्यात येत आहे.
घाटी रुग्णालयात नव्याने बांधण्यात आलेले पदव्युत्तर विद्यार्थी वसतिगृह गेल्या वर्षभरापासून फर्निचरअभावी धूळखात आहे. फर्निचरसाठी आधी निधीची प्रतीक्षा करावी लागली. निधी उपलब्ध झाल्यानंतरही फर्निचर दाखल होत नसल्याची स्थिती आहे, त्यामुळे पदव्युत्तर शिक्षणासाठी आलेल्या डॉक्टरांच्या निवासाची सोय क रण्याचा प्रश्न घाटी प्रशासनासमोर उभा आहे.
निवासव्यवस्था कमी आणि प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक, अशी अवस्था आहे. त्यामुळे डॉक्टरांवर मेडिसिन विभागासमोर बांधण्यात आलेल्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या नव्या वसतिगृहात फर्निचरशिवाय राहण्याची वेळ ओढावली आहे. पदव्युत्तरच्या जागा वाढल्याने घाटीत नवीन वसतिगृह बांधण्यात आले. त्यात प्रत्येकी ४८ खोल्यांचे चार स्वतंत्र भाग आहेत. एका खोलीत प्रत्येकी दोन डॉक्टरांची व्यवस्था करण्याची सुविधा आहे.
याविषयी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या, फर्निचरशिवाय वसतिगृहात राहण्यास विद्यार्थी तयार आहेत. कोणतीही तक्रार नसल्याबाबत ते बॉण्डपेपरवर लिहून देत आहेत. लवकरच फर्निचर प्राप्त होईल.