तांडा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची नावे झळकणार मंगळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 12:54 PM2019-07-08T12:54:57+5:302019-07-08T12:58:47+5:30
शिक्षकांनी विद्यार्थ्यांची 'नासा'कडे केली ऑनलाईन नोंदणी
औरंगाबाद : पैठण तालुक्यातील तांडा बु. येथील जि.प. शाळेच्या मुलांची नावे नासाच्या अवकाश यानातून मंगळ ग्रहावर झळकणार आहेत. त्यासाठी शाळेतील उपक्रमशील शिक्षकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.
या उपक्रमात शाळेचे उपक्रमशील शिक्षक पांडुरंग गोर्डे, महेश मगर आणि प्रल्हाद धायतडक यांनी परिश्रम घेतले आहेत. ‘नासा’ या जगविख्यात अवकाश संशोधन संस्थेचे ‘मंगळ रोव्हर २०२०’ हे अंतरिक्ष यान मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे. या अंतरिक्ष यानाबरोबर स्टेनसील्ड चीपवर आपली नावे पाठवून दुसऱ्या ग्रहावर आपल्या पाऊलखुणा सोडण्याची ऐतिहासिक संधी नासाच्या वतीने जगभरातील सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिली आहे. नासाच्या पसाडेना, कॅलिफोर्निया येथील जेट प्रोपुलशन लॅबोरेटरीतील मायक्रोडिव्हायसेस लॅबोरेटरीमध्ये इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलिकॉनच्या चीपवर मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाएवढ्या रुंदीत नोंदवलेली नावे स्टेन्सिल केली जाणार आहेत. एक डेमी आकाराच्या चीपवर दहा लाख नावे मावतील. याअंतर्गत तांडा बु. येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची, तसेच शिक्षक व शाळेचीही नावे या उपक्रमासाठी नोंदवली आहेत. त्यासाठी आलेल्या बोर्डिंग पासचे वाटप शाळेत करण्यात आले.
आतापर्यंत जगभरातून ७५ लाखांपेक्षा अधिक लोकांनी यासाठी आपली नावे नोंदविली आहेत. तुर्की देशातून २४ लाखांपेक्षा जास्त नोंदणी झाली आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर भारत देश आहे. भारतातून ८ लाखांपेक्षा जास्त लोकांनी आपली नावे नोंदविली आहेत. हे यान अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील कॅप कानावेराल येथील सैन्य दलाच्या तळावरून १७ जुलै २०२० ते ५ आॅगस्ट २०२० दरम्यान लाँच केले जाणार आहे. ते २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यात मंगळावर पोहोचण्याची शक्यता आहे.
‘आयएसओ’ मानांकनप्राप्त शाळा; शिक्षकांनी केली ऑनलाईन नोंदणी
तांडा बु. येथील जि.प. शाळा ही ‘आएसओ’ मानांकनप्राप्त आहे. पहिली ते पाचवीपर्यंतच्या या शाळेत ७९ विद्यार्थी असून, ३ शिक्षक कार्यरत आहेत. शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी सतत परिश्रम घेत आहेत. मंगळावर नावनोंदणीची कल्पना नाशिक येथील शिक्षक मित्राकडून समजली. त्याने ऑनलाईन नोंदणीसाठी ‘लिंक’ही पाठविली होती. त्यानुसार आम्ही शाळा, शिक्षक आणि संपूर्ण विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी केली. नावनोंदणी यशस्वी झाल्याची पोचही आम्हाला प्राप्त झाली आहे. यंदा या शाळेतील ४० विद्यार्थी शासकीय विद्यानिकेतनसाठी पात्र झाले असून, १० विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. आम्ही शाळेत दरवर्षी उपक्रमशील प्रयोग राबवीत असतो, असे मुख्याध्यापक पांडुरंग गोर्डे यांनी सांगितले.