परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याचा पिकअप व्हॅनला धडकून मृत्यू; मित्र गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 12:13 IST2025-04-09T12:12:45+5:302025-04-09T12:13:59+5:30
पिकअप व्हॅन अचानक समोर आल्याने खंडेवाडी फाट्यावर अपघात, हेल्मेट नसल्याने दोघांच्या डोक्याला गंभीर इजा

परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याचा पिकअप व्हॅनला धडकून मृत्यू; मित्र गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर : डी.फार्मसीच्या चौथ्या सत्राची परीक्षा देण्यासाठी महाविद्यालयात जाणाऱ्या यश सुभाष मधुरसे (१९, रा. बिडकीन) या तरुणाचा पिकअप व्हॅनला धडकून मृत्यू झाला. तर त्याचा मित्र ऋषिकेश शिंदे (रा. बिडकीन) हा गंभीर जखमी झाला. मंगळवारी सकाळी ८.३० वाजता हा अपघात घडला.
यश धनेश्वरी महाविद्यालयात डी. फार्मसीच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. रोज बिडकीनवरून तो मित्रासोबत दुचाकीने ये-जा करत होता. सध्या चौथ्या सत्राची परीक्षा सुरू आहे. सकाळी ८ वाजता निघून चित्तेगाव येथून ऋषिकेशला सोबत घेतले. महाविद्यालयाच्या दिशेने जात असताना बडवे कंपनीसमोरील वळणावर अचानक छोटा हत्ती समोर आला. यावेळी दुचाकीचा तोल सुटला व यश थेट पिकअप व्हॅनच्या मागील बाजूने धडकला. स्थानिकांनी धाव घेत दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, ताेपर्यंत यशचा मृत्यू झाला होता. यशच्या अपघाताची माहिती कळताच रुग्णालयात आई, वडील, मोठ्या भावासह महाविद्यालयातील प्राध्यापक, मित्रांची मोठी गर्दी झाली होती.
हेल्मेट असते तर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसाट पिकअप व्हॅन अचानक समोर आल्यानंतर यशच्या दुचाकीच्या हँडलवरील ताबा सुटला. त्यामुळे दुचाकी थेट व्हॅनला जाऊन धडकली व यशच्या डोक्याला गंभीर इजा झाली. हेल्मेट असते तर डोके सुरक्षित राहिले असते, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.