दहावीत कमी गुण पडण्याच्या धास्तीने विद्यार्थीनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 07:02 PM2019-06-03T19:02:14+5:302019-06-03T19:03:54+5:30
आपल्याला कमी गुण मिळतील,असे तिला वाटत होते. यामुळे ती नाराज राहात होती.
औरंगाबाद: दहावी बोर्डाच्या परिक्षेत कमी गुण मिळतील, या धास्तीने एका विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३ जून रोजी सकाळी गारखेडा परिसरातील विजयनगर येथे घडली.
साक्षी अशोक पांढरे (वय १६,रा. विजयनगर)असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. याविषयी पोलिसांनी सांगितले की, विजयनगर येथील व्यवसायाने वाहनचालक असलेल्या अशोक पांढरे हे पत्नी, मुलगा आणि मुलगी साक्षीसह राहतात. १६ वर्षीय साक्षीने मार्च महिन्यात दहावी बोर्डाची परीक्षा दिली होती. येत्या चार ते पाच दिवसात दहावी बोर्डाचा निकाल लागणार आहे. परिक्षेचा निकालाचा दिवस जसा, जसा जवळ येत आहे.तस, तशी साक्षी ही नाराज राहात होती. आपल्याला कमी गुण मिळतील,असे तिला वाटत होते. यामुळे ती नाराज राहात होती. सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास तिची आई कामावर गेली तर वडिल पाणी आणण्यासाठी कडा कार्यालय परिसरात कॅन घेऊन गेले होते. त्यावेळी साक्षी आणि तिचा भाऊ घराच्या गच्चीवर झोपले होते. त्यावेळी ती झोपेतून उठली तेव्हा आई-वडिल घरी नाही आणि भाऊ झोपलेला असल्याचे पाहून तिने दार आतून लावून घेत गळफास घेतला.
पाणी घेऊन आलेल्या वडिलांनी दार वाजविले, मात्र आतून प्रतिसाद न आल्याने त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडले तेव्हा साक्षीने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. या घटनेनंतर त्यांनी साक्षीला बेशुद्धावस्थेत जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी साक्षीला घाटी रुग्णालयात नेण्याचे सांगितले. घाटीत नेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी साक्षीला तपासून तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याविषयी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक ए.बी.शेख, पोहेकॉ एल.बी. हिंगे तपास करीत आहे.