विद्यार्थी वेठीस; आरक्षणाच्या घोळात अडकली अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 05:40 PM2020-12-03T17:40:22+5:302020-12-03T17:45:25+5:30
यंदा कोरोनामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमासह अन्य सर्वच अभ्यासक्रमांवर परिणाम झाला आहे.
औरंगाबाद : मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असल्यामुळे यंदा अभियांत्रिकी, तंत्रनिकेतनसह सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया लांबणीवर पडली आहे.
यंदा कोरोनामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमासह अन्य सर्वच अभ्यासक्रमांवर परिणाम झाला आहे. ‘सीईटी’ परीक्षाही उशिरा झाली. दुसरीकडे, कोरोनातून सावरण्याचा प्रयत्न होत असताना मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. तथापि, तंत्रनिकेतन, आयटीआय अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी सप्टेंबरमध्येच ‘एसईबीसी’ प्रवर्गातून प्रवेश अर्ज केले होते. आता त्या प्रवेश अर्जात दुरुस्ती करुन खुल्या किंवा आर्थिक मागास प्रवर्ग, असे नमूद करण्याची भूमिका संबंधित प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत पडले आहेत. ‘सीईटी’चा निकाल जाहीर होऊन तीन दिवसांचा कालावधी लोटला, तरी अद्याप राज्य प्रवेशपूर्व परीक्षाने अभियांत्रिकी प्रवेशाची अधिसूचना अद्याप जाहीर केलेली नाही. याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे. प्रवेशाची अधिसूचना का जारी झालेली नाही, याबाबत तंत्रशिक्षण संचालनालय किंवा राज्य प्रवेशपूर्व कक्षाकडून मौन बाळगण्यात आले आहे.
यासंदर्भात तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर म्हणाले की, अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत दोन दिवसांत अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे. आम्ही पण, अधिसूचनेची वाट बघत आहोत. ‘सीईटी’चा निकाल लागल्यानंतर चौथा शनिवार, रविवार, सोमवारी गुरुनानक जयंती व आज मंगळवारी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक अशा सलग चार दिवस सुट्या आल्या. कदाचित उद्या किंवा परवा अधिसूचना निघू शकते. यावेळी अभियांत्रिकी प्रवेशाच्या दोन फेऱ्या होतील. तिसरी समुपदेशन फेरी राहील.
तंत्रनिकेतन प्रवेशासाठी ५ डिसेंबरपर्यंत अर्जात दुरुस्तीची मुदत
सन २०२०-२०२१ या शैक्षणिक सत्रासाठी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमासाठी सप्टेंबर महिन्यात प्रवेश अर्ज भरले आहेत. ज्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्ग नमूद केला आहे. ०२त्या विद्यार्थांना आपल्या अर्जात खुला किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असा प्रवर्ग नमूद करावा लागणार आहे. यासाठी ५ डिसेंबरपर्यंत अर्जात दुरुस्तीसाठी मुदत देण्यात आली आहे.