अभ्यासिका उघडण्यासाठी विद्यार्थ्यांचे विद्यापीठात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 07:53 PM2020-10-23T19:53:40+5:302020-10-23T19:56:12+5:30
अभ्यासिकेचे कुलूपतोडण्याचा प्रयत्न
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शुक्रवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास ‘अभ्यासिका उघडा, ग्रंथालय व संशोधक विद्यार्थी वसतिगृह उघडा या मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व ‘एसएफआय’, सत्यशोधक विद्यार्थी आंदोलनच्या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले. दरम्यान, अभ्यासिकेच्या मुख्यद्वाराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अ.भा. विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली, तर विनापरवानगी आंदोलन करणाऱ्या ‘एसएफआय’च्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अ.भा. विद्यार्थी परिषदेने विद्यापीठातील अभ्यासिका सुरू करा, या मागणीसाठी ग्रंथालयालगत रीडिंग हॉलसमोर धरणे आंदोलन सुरू केले. विद्यापीठातील अभ्यासिका सुरू झाल्यास गरीब विद्यार्थ्यांचे पैसे वाचतील, तसेच परीक्षेसाठी आलेले विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी लाभ घेतील, असे या संघटनेचे म्हणणे आहे. नेमके याचवेळी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर ‘एसएफआय’, सत्यशोधक विद्यार्थी आंदोलनचे विद्यार्थी विद्यापीठाचे मुख्य ग्रंथालय, अभ्यासिका व संशोधक विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरू करण्यात यावे, या मागणीचे निवेदन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना देण्यासाठी जमले.
बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक सानप व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे आंदोलक विद्यार्थी इमारतीच्या पायऱ्यांजवळ बसून राहिले. कुलगुरूंकडून या विद्यार्थ्यांना भेटण्याचे बोलावणे आल्यानंतर ते निवेदन देऊन परत आले. तेव्हा लोकेश कांबळे, समाधान बारगळ, अमोल खरात, दीक्षा पवार, सरोज खंदारे, सुरेश सानप, नितीन कांबळे यांना ताब्यात घेऊन बेगमपुरा ठाण्यात नेले. याच दरम्यान, अ.भा. विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेच्या मुख्यद्वाराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला, त्यानाही पोलिसांनी अटक केली.