बीडच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका मिळणार नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 07:00 PM2018-06-07T19:00:38+5:302018-06-07T19:02:06+5:30
काही विद्यार्थ्यांनी पुनर्तपासणीसाठी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रत मिळण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. या विद्यार्थ्यांना देण्यासाठी उत्तरपत्रिकाच नाहीत, असे त्यांना समजावून सांगण्यात येईल, अशी माहिती मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी दिली.
औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील केज येथील गटसाधन केंद्रात जमा केलेल्या उत्तरपत्रिकाच मध्यरात्री जळाल्या होत्या. उत्तरपत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण बहाल करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने जाहीर केला आहे. मात्र यातील काही विद्यार्थ्यांनी पुनर्तपासणीसाठी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रत मिळण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. या विद्यार्थ्यांना देण्यासाठी उत्तरपत्रिकाच नाहीत, असे त्यांना समजावून सांगण्यात येईल, अशी माहिती मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी दिली.
केज येथील गटसाधन केंद्रात जमा होणाऱ्या दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तात्काळ टपालाद्वारे पाठविण्यात येत होत्या. मात्र ३ मार्च रोजी झालेल्या पेपरच्या दिवशी शनिवार असल्यामुळे टपाल कार्यालय बंद होते. यामुळे उत्तरपत्रिका गटसाधन केंद्रात ठेवण्यात आल्या. या दिवशी बारावीचा गणित, दहावीचा द्वितीय भाषा उर्दू आणि होकेशनल विषयांचे पेपर होते.
या विषयांच्या उत्तरपत्रिका ४ मार्च रोजी म्हणजेच रविवारी सायंकाळी लागलेल्या आगीत बारावीच्या १ हजार १९९ आणि दहावीच्या २२१ उत्तरपत्रिका जळून कोळसा झाला. विभागीय मंडळाने दिलेल्या अहवालानुसार परीक्षा मंडळाने नियमानुसार उत्तरपत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णय घेतला. इतर विषयांना जेवढे सरासरी गुण मिळाले. तेवढेच गुण या विषयातही बहाल करण्यात आले. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविण्यासाठी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीची मागणी करण्याचा अधिकार आहे.
या जळालेल्या उत्तरपत्रिकांमधील काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांची मागणी मंडळाकडे केली आहे. पण उत्तरपत्रिकाच जळालेल्या असल्यामुळे त्या कोठून देणार? असा सवाल उपस्थित झाला. यावर विभागीय सचिवांनी राज्य मंडळाकडून मार्गदर्शन मागविले होते. राज्य मंडळाने विद्यार्थ्यांनाच सर्व प्रकरणाची वस्तुस्थिती समजावून सांगा, असा सल्ला दिला आहे. त्यानुसार आता या प्रकरणातील विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकाच नाहीत, असे समजावून सांगण्यात येणार असल्याचेही सुगता पुन्ने यांनी सांगितले.