क्लासेसवाले, विद्यार्थी संघटनांचा वाद चिघळला
By Admin | Published: August 26, 2015 11:43 PM2015-08-26T23:43:30+5:302015-08-26T23:43:30+5:30
बीड : खाजगी शिकवण्यांमधील सोयी-सुविधा आणि वाढीव शुल्काच्या विरोधात विद्यार्थी संघटनांनी आंदोलने केली होती. यावर क्लासेसवाल्यांनी खंडणीसाठी
बीड : खाजगी शिकवण्यांमधील सोयी-सुविधा आणि वाढीव शुल्काच्या विरोधात विद्यार्थी संघटनांनी आंदोलने केली होती. यावर क्लासेसवाल्यांनी खंडणीसाठी संघटना असे करीत असल्याचा आरोप केला होता. या आरोपावरून संघटना आक्रमक झाल्या आणि आरोप करणाऱ्या हनुमंत भोसले यांच्या तोंडाला बुधवारी शासकीय विश्रामगृहासमोर काळं फासले. यामुळे क्लासेसवाले, विद्यार्थी संघटनांचा वाद चांगलाच चिघळला आहे.
खाजगी शिकवणीवाले अनाधिकृतपणे विद्यार्थ्यांकडून हजारो रूपये शुल्क आकारतात. एवढे शुल्क घेऊनही त्यांना योग्य त्या सुविधा देत नाहीत. मुलींची सुरक्षा, पिण्याचे पाणी, आसन व्यवस्था, अनुभवी शिक्षक, वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था नसते. अनेक क्लासेसवाले तर शुल्क भरलेल्या पावतीवर रजिस्टर नंबर नसतानाही हजारो रूपये सेवा कर आकारतात. या सर्व निर्णयांविरोधात मागील महिन्यापासून विद्यार्थी संघटनांचा लढा आहे. आंदोलने केली, मोर्चे काढले परंतु खासगी क्लासेसवाल्यांनी याला वेगळे वळण दिले. खंडणीसाठी विद्यार्थी संघटना असे प्रकार करीत असल्याचा आरोप हनुमंत भोसले यांनी केला होता. बुधवारी विद्यार्थी संघटनांनी या संदर्भात स्पष्टीकरण मागितले परंतु ते देता न आल्याने तू - तू मैं - मैं झाली. यातून वातावरण बिघडले. काही कार्यकर्त्यांनी भोसले यांच्या तोंडाला काळे फासून राग व्यक्त केला.
‘त्या’ संघटनेचे नाव जाहीर करा
क्लासेसवाल्यांकडे ज्या संघटनेने खंडणी मागितली त्यांचे नाव जाहीर करावे, असे खुले आव्हान विद्यार्थी संघटनांनी दिले आहे. सगळ्याच संघटनांना नाहक गोवू नये, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली.
क्लासेवाल्यांची पोलिसांकडे धाव
भोसले यांच्या तोंडाला काळे फासल्यानंतर क्लासेसवाल्यांनी शिवाजीनगर ठाणे गाठून तक्रार दिली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता. (प्रतिनिधी)