खाजगी क्लासचालकांना पुरविला जातोय शाळांकडून विद्यार्थ्यांचा डाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:52 PM2019-04-20T23:52:29+5:302019-04-20T23:52:51+5:30
८ वी ते १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पालकांना सतत खाजगी क्लास चालकांचे फोन येत आहेत. आपल्या पाल्याला आमच्या क्लासमध्ये शिकवणी लावा, लवकरात लवकर नोंदणी केल्यास शुल्कात मोठ्या प्रमाणात सूट दिली जाईल, असे आमिष दाखविण्यात येत आहे.
औरंगाबाद : ८ वी ते १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पालकांना सतत खाजगी क्लास चालकांचे फोन येत आहेत. आपल्या पाल्याला आमच्या क्लासमध्ये शिकवणी लावा, लवकरात लवकर नोंदणी केल्यास शुल्कात मोठ्या प्रमाणात सूट दिली जाईल, असे आमिष दाखविण्यात येत आहे. सतत येणाºया फोनमुळे त्रस्त झालेल्या पालकांनी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.
बारावी नंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळण्यासाठी नीट, जेईई, एमएच-सीईटी अशा परीक्षा द्याव्या लागतात. या परीक्षांची तयारी विद्यार्थी नववीत गेल्यानंतर सुरू होते. नववीत असतानाच बारावीच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी खाजगी क्लास लावण्यात येत आहेत. दहावी झाल्यानंतरही अकरावी आणि बारावीमध्ये शिक्षण घेताना या परीक्षेसाठी खाजगी क्लास लावण्यात येतो. महाविद्यालयात विद्यार्थी कमी आणि खाजगी क्लासला अधिक, अशी परिस्थिती सध्या सर्वत्र पाहावयास मिळते. खाजगी क्लासमध्ये विद्यार्थ्यांना आकृष्ट करण्यासाठी तीव्र स्पर्धा सुरू आहे. यासाठी विविध प्रलोभने, आमिषे दाखविण्यात येतात. यात आता आठवीच्या विद्यार्थ्यांना ओढण्यात येत आहे. आठवीपासूनच विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासमध्ये प्रवेश घ्यावा, यासाठी खाजगी क्लास चालकांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी क्लासेसवाल्यांनी शहरातील नामांकित शाळांकडून विद्यार्थ्यांची माहिती मिळविली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात विद्यार्थिनींचीही माहिती असल्यामुळे पालकांना धक्का बसला आहे. या खाजगी संस्थाचालकांकडे पालकांचा मोबाईल नंबर, घराचा पत्ता, विद्यार्थ्यांचा मोबाईल नंबर, अशी सगळीच गोपनीय माहिती जमा झाली आहे. ही माहिती संबंधित विद्यार्थ्यांनी शाळेकडे नोंदविलेली असल्यामुळे शाळांकडूनच क्लासेसवाल्यांना विद्यार्थ्यांचा डाटा विकण्यात आल्याचा संशय पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. या तक्रारींची शहानिशा शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण हे करीत आहेत. यात शाळा दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याची शिफारसही शासनाकडे केली जाईल, असेही डॉ.चव्हाण यांनी सांगितले.
कोट
खाजगी क्लासवाल्यांकडून सतत फोन येत असल्याच्या तक्रारी दहा ते बारा पालकांनी केल्या आहेत. या क्लासवाल्यांना विद्यार्थ्यांचा डाटा कोणी दिला, असा सवाल पालकांनीच उपस्थित केला आहे. पालकांच्या तक्रारीनुसार संबंधित नामांकित शाळांकडे विचारणा करण्यात आली आहे. यातील सत्य परिस्थिती लवकरच बाहेर येईल.
- डॉ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी, माध्यमिक
---