स्वाध्यायपासून विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:04 AM2021-03-25T04:04:27+5:302021-03-25T04:04:27+5:30

योगेश पायघन औरंगाबाद : कोरोनामुळे शाळा बंद असली तरी विद्यार्थ्यांचा अभ्यास व्हावा यासाठी शिक्षण विभागाने स्टुडंट व्हाॅट्सॲप बेस्ड डिजिटल ...

Students deprived of homework | स्वाध्यायपासून विद्यार्थी वंचित

स्वाध्यायपासून विद्यार्थी वंचित

googlenewsNext

योगेश पायघन

औरंगाबाद : कोरोनामुळे शाळा बंद असली तरी विद्यार्थ्यांचा अभ्यास व्हावा यासाठी शिक्षण विभागाने स्टुडंट व्हाॅट्सॲप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट (स्वाध्याय) योजना सुरू केली; मात्र ऑनलाईन शिक्षणाकडे विविध कारणांनी ६० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पाठ फिरवलेली असल्याने स्वाध्याय मालिकेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात केवळ ७.२३ टक्के विद्यार्थ्यांनीच स्वाध्याय सोडवण्यासाठी नोंदणी केली.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) स्टुडंट व्हाॅट्सॲप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट (स्वाध्याय) योजना ३ नोव्हेंबरला सुरू केली. एकंदर जिल्ह्यात शाळा सुरू झाल्यावर याकडे दुर्लक्ष झाले होते; मात्र शाळा पुन्हा बंद झाल्यावर दर शनिवारी घेण्यात येणाऱ्या उपक्रमास गेल्या चार आठवड्यांत जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर १९ व्या आठवड्यात या आकडेवारीत कमालीची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. स्मार्टफोन नाही, इंटरनेट नाही, व्हॉट्सॲप नाही, एका घरात पालक आणि विद्यार्थ्यांत एकच मोबाईल यासह अनेक तांत्रिक कारणांमुळे ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणात अडचणी येत असल्याने शिक्षणाची परिस्थिती चिंताजनक आहे.

अठराव्या आठवड्यात ३० हजारांपेक्षा कमी नोंदणी १९ व्या आठवड्यात ६० हजारांपर्यंत पोहोचली. आतापर्यंत पहिली ते दहावीच्या ६० हजार ९२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली तर ५७ हजार १६९ विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडविला आहे. शिक्षण विभागानेही विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी डाएटमार्फत वेळोवेळी फाॅलोअप घेतला जात आहे. स्वाध्यायला आता प्रतिसाद मिळत असला तरी वंचित विद्यार्थी संख्या काळजीत टाकणारी आहे.

---

नोंदणीचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न

स्वाध्यायसाठी विद्यार्थ्यांकडून नोंदणी व ते सोडवून घेण्यासाठी शाळांना सूचना दिल्या आहेत; मात्र इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबादची परिस्थिती वेगळी आहे. फार कमी काळ शाळा सुरु राहिल्या. पुन्हा बंद झाल्या. त्यातच अनेक शिक्षक पाॅझिटिव्ह आल्याने शाळा बंद ठेवाव्या लागल्या आहेत. नोंदणीत जिल्हा मागे असून हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु असून या आठवड्यात विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

-सूरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग, जि.प. औरंगाबाद

--

जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी ८,०२,०२०

स्वाध्यायसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी ६०,९२४

स्वाध्याय सोडवलेले विद्यार्थी ५७,१६९

---

उर्दूृनंतर मराठी स्वाध्यायाला प्रतिसाद

उर्दूच्या स्वाध्याय मालिकेला सर्वाधिक प्रतिसाद आहे. त्यापाठोपाठ मराठी, त्यानंतर गणित आणि विज्ञान विषयांचा क्रमांक लागतो. तर नोंदणी व स्वाध्याय सोडवण्यात औरंगाबाद तालुक्यासह गंगापूर आघाडीवर असून फुलंब्री आणि खुलताबाद तालुक्यात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद सर्वात कमी आहे.

---

स्वाध्यायची प्रश्नावली बहुपर्यायी असल्याने पटकन सोडवून होते. शिवाय अभ्यासाची उजळणी त्यामुळे सोपी झाली आहे. त्यामुळे किती कळलं तेही लगेच निकालामुळे कळते.

-प्रांजल सोनवणे, विद्यार्थिनी

पाच आठवड्यापासून प्रश्नावली सोडवत आहे. स्वाध्याय योजनेमुळे काय शिकलो ते किती कळाले लगेच लागणाऱ्या निकालातून कळते. त्यामुळे अभ्यासात त्याचा फायदा होत आहे.

-गाैरव खडके, विद्यार्थी

Web Title: Students deprived of homework

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.