विद्यार्थी उतरले रस्त्यावर
By Admin | Published: June 25, 2014 11:56 PM2014-06-25T23:56:51+5:302014-06-26T00:35:36+5:30
माजलगाव: शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच शाळा, महाविद्यालय परिसरात गतिरोधक बसविण्यात यावेत, या मागणीसाठी बुधवारी शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला.
माजलगाव: शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच शाळा, महाविद्यालय परिसरात गतिरोधक बसविण्यात यावेत, या मागणीसाठी बुधवारी शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरात एकमेव मुख्य रस्ता असून, या रस्त्यावर कोठेही गतिरोधक नसल्याने छोटी-मोठी वाहने भरधाव जातात. या सुसाट वाहनांपासून शाळकरी विद्यार्थ्यांना अपघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे या वाहनांची गती कमी व्हावी, यासाठी मुख्य रस्त्यांसह शाळा, महाविद्यालय परिसरातील रस्त्यांवर गतिरोधक बसवावेत, या मागणीसाठी बुधवारी शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय भीमसेनेचे महासचिव सय्यद सलीम यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले. तसेच मुख्य रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या रोहित्राचीही दुरवस्था झाली असून, त्याचीही दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी विद्यार्थ्यांनी केली. विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडल्यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देऊन त्यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेतले. (वार्ताहर)