विद्यापीठातील ‘कमवा-शिका’च्या विद्यार्थ्यांना ८०० रुपये मानधन वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 06:13 PM2018-08-03T18:13:04+5:302018-08-03T18:18:36+5:30
कमवा आणि शिका योजनेत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्यासह मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले अनेक विषय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या गुरुवारी झालेल्या पहिल्याच बैठकीत मार्गी लागले.
औरंगाबाद : कमवा आणि शिका योजनेत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्यासह मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले अनेक विषय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या गुरुवारी झालेल्या पहिल्याच बैठकीत मार्गी लागले.
विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत बैठकीला प्रारंभ होताच सर्व नवनियुक्त सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कुलगुरूंनी मागील तीन वर्षांतील प्रगतीचा आढावा सादर केला. डॉ.राजेश करपे यांनी अजेंड्यावरील ३० पैकी एकही विषय विद्यार्थीहिताचा नसल्याबद्दल खंत व्यक्त करून ऐनवेळच्या विषयात विद्यार्थी हिताला प्राधान्य देण्याची सूचना केली. ही सूचना कुलगुरूंनी मान्य केली. एम. ए., एम. फिल. आणि पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका योजनेत मासिक १३०० ते १५०० रुपये मानधन देण्यात येत होते.
हे मानधन वाढवून २००० हजार करण्याची मागणी डॉ. करपे यांनी केली. काहींनी १६०० रुपये, १८०० रुपयेपर्यंत वाढ करावी, अशा सूचना केल्या. मात्र डॉ. करपे यांनी २ हजार रुपयांचा आग्रह धरला. यास कुलगुरूंनीही अनुमोदन दिले. मात्र प्रतिदिवस ७० रुपये याप्रमाणे ही रक्कम २१०० रुपये होते. त्यामुळे सर्वानुमते प्रतिमहिना २१०० रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला.
विद्यापीठ निधीच्या उधळपट्टीला लगाम
विद्यापीठाच्या निधीतून विविध विभाग, प्राधिकरणावर नेमणुकांचा सपाटा प्रशासनाने लावला होता. आजच्या बैठकीत तब्बल १३ विषय हेच होते. याविषयी ज्येष्ठ सदस्य संजय निंबाळकर यांनी चिंता व्यक्त करून विद्यापीठ दिवाळखोरीत निघण्याची शक्यता व्यक्त केली. यास सर्वच सदस्यांनी अनुमोदन दिल्यामुळे हे सर्व विषय प्रलंबित ठेवून त्याविषयीचा निर्णय घेण्यासाठी समितीची स्थापना केली. या समितीच्या अध्यक्षपदी संजय निंबाळकर, सदस्य प्राचार्य जयसिंगराव देशमुख, डॉ. राजेश करपे, वित्त व लेखाधिकारी मडके आणि प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांचा समावेश आहे. समितीच्या अहवालानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
‘कॅग’ च्या ताशेऱ्यावर सत्यशोधन समिती
२०१४ मध्ये झालेल्या विद्यापीठाच्या अंकेक्षणात (आॅडिट) उधळपट्टीवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. हा मुद्दा डॉ.शंकर अंभोरे यांनी उपस्थित केला होता. याची कारणे शोधण्यासाठी समितीची स्थापना करून अध्यक्षस्थानी डॉ. शंकर अंभोरे, सदस्य प्राचार्य हरिदास विधाते, डॉ.फुलचंद सलामपुरे, वित्त व लेखाधिकारी मडके आणि प्रभारी कुलसचिव डॉ.साधना पांडे यांचा समावेश करण्यात आला.
विद्यार्थी हितांना प्राधान्य दिले
विद्यापीठाच्या निर्वाचित व्यवस्थापन परिषद सदस्यांची पहिलीच बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या बैठकीत विद्यार्थी हितांनाच प्राधान्य देण्यात आले.
- डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू