शासकीय वसतिगृहाच्या दुरवस्थेबद्दल विद्यार्थ्यांनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 19:03 IST2024-12-24T19:03:10+5:302024-12-24T19:03:57+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाची जोरदार निदर्शने

शासकीय वसतिगृहाच्या दुरवस्थेबद्दल विद्यार्थ्यांनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर
छत्रपती संभाजीनगर : किलेअर्क परिसरातील १००० मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या देखभाल दुरुस्तीसाठी शासनाकडून अडीच कोटी रुपयांचा निधी प्राप्त आहे. या निधीतून वसतिगृहातील दुरवस्था दूर करण्यासाठी डिसेंबरअखेर बैठक घेऊन निविदा प्रक्रिया करणे, तसेच ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीसाठी प्राप्त ८ कोटींचा निधी विद्यार्थ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करण्यात येईल, असे आश्वासन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप भोगले यांच्याकडून मिळाल्यानंतरच विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे मराठवाडा कार्याध्यक्ष संतोष अंभोरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शेकडो विद्यार्थ्यांनी समाज कल्याण जिल्हा कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘स्वाधार आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची’, ‘वसतिगृहातील खाणावळीचा दर्जा सुधारलाच पाहिजे’, अशा घोषणा देत समाज कल्याण कार्यालय दणाणून सोडले. दरम्यान, आजारी असल्यामुळे समाज कल्याण सहायक आयुक्त रजेवर होते. त्यांनी मोबाइलवरून आंदोलक विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. या कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक जंगाळे, सोमवंशी, महाडिक यांनी आंदोलक विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारले.
निवेदनात किलेअर्क परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर १००० मुलांच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या खोल्यांचे दरवाजे, खिडक्या तुटलेल्या आहेत. स्वच्छतागृहे नादुरुस्त आहेत. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेतील रक्कम शैक्षणिक वर्षं संपले तरी विद्यार्थ्यांचा खात्यावर जमा नाही. ती लवकरात लवकर जमा करावी, या शिष्यवृत्तीसाठी असलेल्या शैक्षणिक खंड, एटीकेटी अशा अनेक जाचक अटी काढून टाकाव्यात, विद्यार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनात योगेश आचलखांब, दीपक पाईकराव, विजय भिसे, प्रणिल पंडित, रोहित झिने, दिलीप अहिरे, अमोल रसाळ आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.