महाज्योतीची फेलोशिप हवी असेल तर नागपूरवारी करा !
By योगेश पायघन | Published: August 29, 2022 11:36 AM2022-08-29T11:36:15+5:302022-08-29T11:38:32+5:30
संशोधक विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी, १ ते १५ सप्टेंबरदरम्यान नागपूरला उपस्थित राहण्याच्या सूचना
औरंगाबाद : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन छात्रवृत्ती पीएचडी २०२२ च्या छाननी प्रक्रियेसाठी मूळ प्रमाणपत्रे, कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी १ ते १५ सप्टेंबरदरम्यान नागपूर येथील महाज्योती कार्यालयात अर्जदार विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले आहे. मात्र, विभागीय कार्यालय शहरात असताना नागपूरवारी का, असा प्रश्न करीत महाज्योतीच्या विभागीय कार्यालयात कागदपत्र पडताळणीची मागणी संशोधक विद्यार्थ्यांतून होत आहे.
ई-मेलद्वारे विद्यार्थ्यांना या सूचना शनिवारी संशोधक विद्यार्थ्यांना प्राप्त झाल्या आहेत. अर्जाची प्रत, क्रमानुसार मागितलेली २० प्रकारची कागदपत्रे व प्रमाणपत्रे घेऊन कार्यालयात आल्यावर प्रथम नोंदणी करावी. त्याच क्रमाने पडताळणी होणार आहे. पडताळणीदरम्यान अधिकारी, कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालू नये. आक्षेप, शंका असल्यास प्रकल्प व्यवस्थापकांना भेटून समस्या मांडावी. अर्जात दुरुस्ती असल्यास मूळ कागदपत्र तपासणीवेळी करून घ्यावी. कोणतीही मूळ कागदपत्रे जमा करू नयेत. गर्भवती महिला उमेदवार असल्यास त्यांनी अनुपस्थितीची माहिती मेलद्वारे द्यावी. त्यांना पालक किंवा प्रतिनिधीमार्फत पडताळणीची सुविधा देण्यात आली आहे. पडताळणी करून न घेणारे, अनुपस्थित उमेदवारांचे अर्ज रद्द ठरवण्यात येणार असून, मूळ कागदपत्र पडताळणीनंतरच पात्रता व अपात्रता ठरवण्यात येणार असल्याचे प्रकल्प व्यवस्थापकांनी परिपत्रकात म्हटले आहे.
विभागीय कार्यालयात का होत नाही पडताळणी?
गणेशोत्सव आणि शासकीय सुट्यांत केवळ १३ दिवसांचा कालावधी पडताळणीसाठी देण्यात आला आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना नागपूरला जाऊन पडताळणी खर्चिक व अडचणीची आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्वाधिक अर्जदार महाज्योतील फेलोशिपसाठी आहे. त्यात विद्यापीठात ६ सप्टेंबरपर्यंत प्री पीएचडी कोर्स वर्क सुरू असून, त्याला उपस्थितीचे बंधन आहे. त्यामुळे उर्वरित सात दिवसांत संशोधक विद्यार्थ्यांना नागपूरला धाव घ्यावी लागणार आहे. औरंगाबाद येथे महाज्योतीचे विभागीय कार्यालय असताना तिथे का पडताळणी केली जात नाही, असा सवालही संशोधक विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.