विद्यार्थ्यांची हेळसांड
By Admin | Published: April 25, 2016 11:09 PM2016-04-25T23:09:46+5:302016-04-25T23:40:28+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड एकीकडे दुष्काळामुळे शेतकऱ्यांना मुलांवर शिक्षण सोडून देण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे भटक्या विमुक्त प्रवर्गातील २४ हजार ३२८ विद्यार्थ्यांना वर्ष संपून
व्यंकटेश वैष्णव , बीड
एकीकडे दुष्काळामुळे शेतकऱ्यांना मुलांवर शिक्षण सोडून देण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे भटक्या विमुक्त प्रवर्गातील २४ हजार ३२८ विद्यार्थ्यांना वर्ष संपून गेले तरी शिष्यवृत्ती नसल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी समोर आला आहे.
मागील चार वर्षांपासून विशेष समाजकल्याण विभागांतर्गत शिष्यवृत्ती प्रक्रिया आॅन लाईन केलेली आहे. जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांतील मुख्याध्यापक-प्राचार्यांकडून वेळेत आॅन लाईन शिष्यवृत्ती अर्ज समाजकल्याण कार्यालयाला प्राप्त न झाल्याने शासनाकडून शिष्यवृत्तीचा निधी आलेला नसल्याचे समाजकल्याण विभागाचे म्हणणे आहे.
एकीकडे दुष्काळामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा भरमसाट पैसा आणायचा कुठून, अशी परिस्थिती आहे. यातच शासन व महाविद्यालय प्रशासनात कामकाजास विलंब होत असल्याने गोरगरीब विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वर्ष संपले तरी वंचित आहेत.
जिल्ह्यात एकूण ५५ हजारांवर शिष्यवृत्तीधारक आहेत. यापैकी एस.सी., एस.टी. ओ.बी.सी., व्हीजेएनटी प्रवर्गातील २६ हजार ३२८ विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत.
पुढील आठवडाभरात जिल्ह्यातील २६ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी दिला आहे.
संबंधित समाजकल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक यांची उदासीनता असल्याचेही आरोपात म्हटले आहे.