महापरीक्षा पोर्टलच्या विरोधात विद्यार्थ्यांचा आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:57 PM2019-07-17T23:57:05+5:302019-07-17T23:57:44+5:30
राज्य शासनाने विविध विभागांमधील रिक्त पदांच्या जागांसाठी पदभरती सुरू केली आहे. यासाठी ई-महापरीक्षा नावाचे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या कारभारावर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविले. या परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकतेचा अभाव असून, लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोपही केला आहे.
औरंगाबाद : राज्य शासनाने विविध विभागांमधील रिक्त पदांच्या जागांसाठी पदभरती सुरू केली आहे. यासाठी ई-महापरीक्षा नावाचे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या कारभारावर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविले. या परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकतेचा अभाव असून, लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोपही केला आहे.
राज्य शासनाने तलाठी, ग्रामसेवक, पोलीस, आरोग्य विभाग, एमआयडीसी, अभियांत्रिकी, महावितरण विभागातील कर्मचाऱ्यांची भरती ई-महापोर्टलच्या माध्यमातून करण्याची घोषणा केली आहे. २ ते २८ जुलैदरम्यान तलाठी पदासाठी आॅनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेत एका विद्यार्थ्यास एकदाच परीक्षा देण्याची संधी देण्याची घोषणा पदांच्या जाहिरातीमध्येच करण्यात आली होती. मात्र काही विद्यार्थ्यांनी ई- मेल बदलून पाच ते सहा वेळा परीक्षा दिल्याची माहिती स्पर्धक विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ला भेट देऊन दिली. याविषयी विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टलकडे तक्रार केली असता, त्यांना कोणताही प्रतिसाद देण्यात येत नाही. तलाठी पदासाठी उमेदवाराने एकापेक्षा अधिक वेळा परीक्षा दिलेली नसल्याचे टोल फ्री क्रमांकावर सांगण्यात येत असल्याचेही उमेदवारांनी स्पष्ट केले. या पोर्टलच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता, संबंधित विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती विचारून घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थी आपले नुकसान होईल, या भीतीपोटी तक्रार करण्यास घाबरत आहेत. याविषयी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने महापरीक्षेच्या टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधला असता, त्यांनी परीक्षार्थी नसल्यामुळे कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. तसेच महापरीक्षा पोर्टल कोणत्या विभागाच्या नियंत्रणात चालविण्यात येते? पोर्टलचे संचालक कोण? परीक्षा घेण्यासाठी कोणती एजन्सी नेमली? आदीविषयी कोणतीही माहिती देण्यास नकार दर्शविला. महापरीक्षाचे आयटी हेड कुलदीप चतुर्वेदी यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. संदेश पाठवूनही उत्तर दिले नाही.
चौकट
तलाठी भरतीमध्ये गैरव्यवहाराचा संशय?
तलाठी भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू असल्याचा संशय स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया औरंगाबाद, पुण्यातील युवकांमध्ये व्यक्त केला जात आहे. ई-महापरीक्षा पोर्टलच्या परीक्षेमध्ये पारदर्शकतेच्या अभावामुळे या संशयाला अधिक बळकटी मिळत असल्याची चर्चा सुरू आहे. तलाठी पदाच्या एका जागेवर निवड करण्यासाठी २० लाख रुपये काही मध्यस्थ घेत असल्याची कुजबुज सुरू आहे. परंतु कुणीही समोर येत नाही.
-----