विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या! सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकासोबत केंद्रीय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
By योगेश पायघन | Published: March 3, 2023 08:55 PM2023-03-03T20:55:03+5:302023-03-03T20:59:08+5:30
विद्यार्थ्यांना सुविधेसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग, शैक्षणिक सत्र वेळेत सुरू करण्यासाठी उपाययोजना
छत्रपती संभाजीनगर ः शैक्षणिक वर्ष २०२३-२३ साठी सामायिक प्रवेश परीक्षांचे (सीईटी) वेळापत्रक सीईटीसेलकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आले. विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षा, निकाल आणि केंद्रीय प्रवेशासाठी नोंदणीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठीची एमएचटी-सीईटी ९ ते २० मे दरम्यान होणार असून निकाल १२ जुन रोजी जाहीर होईल. तर केंद्रीय प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रीयेला २६ जुलैपासून सुरूवात होणार आहे.
सामाईक प्रवेश परीक्षा व केंद्रीभुत प्रवेश प्रक्रीयेकरीता मोबाईल प्रणालीचा यावर्षी वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी मोबाईल, टॅब्लेट, अॅण्ड्राईड फोन, आयओएस कार्यप्रणाली आधारीत मोबाईल अप्लिकेशन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच मेल एसएमएस, व्हाटसअॅपने सुद्धा विविध सुचना विद्यार्थ्यांना प्राप्त होतील. परीक्षा व नोंदणी काळात आठवड्याचे सात दिवस सकाळी नऊ ते सात वाजेदरम्यान मदत कक्ष सुरू राहील. परीक्षेसंदर्भात परिक्षेच्या आधी ३ दिवस आणि त्यानंतर ३ दिवस मदत कक्षातून सेवा देण्यात येईल. परीक्षा केंद्रासाठी एक नोडल लाॅग इन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच एक केंद्र प्रमुख, एक सर्व्हर व्यवस्थापक, एक नेटवर्क तज्ज्ञ, १५ परीक्षार्थ्यांमागे एक समवेक्षक, १० परीक्षार्थ्यांमागे एक सुरक्षा रक्षक, एक महिला एक पुरूष तपासणीस, एक मुख्य पर्यवेक्षक, एक महिला व पुरूष स्थानिक पोलिसातील हवालदार तसेच सफाईगार सेवा पुरवठादारांमार्फत पुरवण्यात येणार आहे. यावर्षी प्रवेशपत्रावर आणि गुणपत्रिकेवर प्रमाणिकरणासाठी बारकोड, क्यूआरकोड सुरक्षा दिली जाणार आहे. तसेच राज्यात आवश्यकतेनुसार तालुक्याच्या ठिकाणीही परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सीईटी सेकलकडून सांगण्यात आले. एनटीएच्या वेळापत्रकानुसार नीट युजी परीक्षा ७ मे रोजी होणार आहे. कोरोनाकाळात कोलमडलेले शैक्षणिक वेळापत्रक यावर्षी सुरळीत करण्याच्या दृष्टीने व वेळेत पुढील शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या दृष्टीन नियोजन केल्याचे वेळापत्रकावरून दिसते. मात्र, प्रत्यक्षात निकालावर पुढील प्रवेशप्रक्रीयचे भविष्य अवलंबून आले.
असे आहे वेळापत्रक :
अभ्यासक्रम -परीक्षा -निकाल - कॅप राऊंड नोंदणी- कट ऑफ
एमबीए -१८ आणि १९ मार्च -३ एप्रिल -५ एप्रिल, २३ मे
एमसीए -२५ आणि २६ मार्च - ११ एप्रिल -१३ एप्रिल -३० मे
विधी पाच वर्षे अभ्यासक्रम- - २ एप्रिल -८ एप्रिल -९ एप्रिल -१४ जुलै
विधी तीन वर्षे अभ्यासक्रम - २ आणि ३ मे -१० मे -२२ मे -१५ जुलै
बीए-बीएस्सी बीएड, बीएड-एमएड -२ एप्रिल -८ एप्रिल -९ एप्रिल -१४ जुलै
एमपीएड - २३ ते २६ एप्रिल -५ मे -१५ मे -२० मे
बीएचएमसीटी -२० एप्रिल -२ मे -२२ मे -१४ जुलै
बी प्लॅनिंग -२३ एप्रिल -२ मे -२२ मे -१४ जुलै
फाईन आर्ट -१६ एप्रिल -२६ एप्रिल -३ मे -१५ जुलै
बी. डिझाईन -३० एप्रिल -२ मे -२२ मे -२६ जुलै
कृषी, अभियांत्रिकी,औषधनिर्माणशास्त्र -९ ते २൦ मे -८ जून -१२ जून -२६ जुलै