शाळेत जेवल्यानंतर विद्यार्थ्यांना विषबाधा; पालकांच्या आरोपाने युनिव्हर्सल हायस्कूल चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 11:51 AM2023-12-15T11:51:46+5:302023-12-15T11:52:46+5:30

उपचारासाठी विविध हॉस्पिटलमध्ये विद्यार्थी दाखल; पालकांच्या आरोपानंतर असा काही प्रकार घडला नसल्याचा शाळा व्यवस्थापनाचा दावा

Students poisoned after eating at school; Universal High School in discussion again | शाळेत जेवल्यानंतर विद्यार्थ्यांना विषबाधा; पालकांच्या आरोपाने युनिव्हर्सल हायस्कूल चर्चेत

शाळेत जेवल्यानंतर विद्यार्थ्यांना विषबाधा; पालकांच्या आरोपाने युनिव्हर्सल हायस्कूल चर्चेत

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा एमआयडीसीतील युनिव्हर्सल हायस्कूलमध्ये पिण्याच्या पाण्यासह इतर खाद्यपदार्थांतून विषबाधा झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी गुरुवारी सायंकाळी केला. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर शहरातील विविध रुग्णालयांत उपचार करण्यात आल्याचे संबंधित हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले. या घटनेविषयी शाळा व्यवस्थापनास विचारले असता, त्यांनी असा काही प्रकार शाळेत घडला नसल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. या घटनेची रात्री उशिरापर्यंत पोलिसांत नोंद झालेली नव्हती.

युनिव्हर्सल हायस्कूल मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. या शाळेची मान्यताच रद्द करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यास काही दिवस हाेत नाहीत तोच गुरुवारी सायंकाळी शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या ग्रुपवरील चर्चेनुसार ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शाळेतील पाणी, अन्न खाल्ल्यामुळे उलट्या, पोटदुखी, चक्कर येण्याचे प्रकार झाल्याचे दिसते. पालकांनी शहरातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल केले. एमआयडीसी सिडकोचे निरीक्षक गौतम पातारे यांना विचारले असता, त्यांनी कोणत्याही विद्यार्थ्यांस विषबाधा झाल्याची माहिती पोलिस ठाण्यापर्यंत आली नसल्याचे सांगितले.

असा काही प्रकार घडलाच नाही
युनिव्हर्सल हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना अतिशय सुरक्षित अन्न दिले जाते. शाळेत ६०० विद्यार्थी आहेत. आमच्या प्राचार्यांपर्यंत ७ विद्यार्थ्यांना उलटी, पोटदुखीचा त्रास होत असल्याची माहिती आली. मात्र, ७ विद्यार्थ्यांनाच शाळेतील अन्न, पाण्यामुळे त्रास कसा होऊ शकेल? शाळेतील पाण्यामुळे, अन्नामुळे त्रास झाला असता तर सर्वच ६०० विद्यार्थ्यांना झाला असता. त्यामुळे शाळेत असा काही प्रकार घडलेला नाही. तरीही शाळा व्यवस्थापन घटनेची शहानिशा करीत आहे.
- कल्पेश फळसमकर, समन्वयक, युनिव्हर्सल हायस्कूल

कोणत्या ठिकाणी किती मुलांवर उपचार ?
४ जण ॲडमिट, ६ मुलांवर ओपीडीत उपचार

बजरंग चौक, एन-५ येथील एका रुग्णालयात उलटी, पोटदुखी, मळमळ अशा त्रासामुळे १० मुले दाखल झाली. यातील ४ मुलांना उपचारासाठी ॲडमिट करण्यात आले. तर ६ मुलांवर ओपीडीत उपचार करून सुटी देण्यात आल्याचे डाॅ. विनोद ताेतला यांनी सांगितले.

७ मुलांवर ओपीडीत उपचार
एन-७ येथील एका रुग्णालयात ७ मुलांवर ओपीडीत उपचार करण्यात आले. या मुलांना उलटी, मळमळचा त्रास होत होता. कुणालाही ॲडमिट करावे लागले नाही, असे डाॅ. प्रशांत चव्हाण यांनी सांगितले.

एका मुलीवर ओपीडीत उपचार
समर्थनगरातील रुग्णालयात एका मुलीवर ओपीडीत उपचार करण्यात आले. मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे डाॅ. गौरांग पांडे यांनी सांगितले.

एक विद्यार्थिनी ॲडमिट
डाॅ. हेडगेवार रुग्णालयात एका विद्यार्थिनीला उपचारासाठी ॲडमिट करण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे, असे डाॅ. अनंत पंढरे यांनी सांगितले.

भाचा-भाची दोघे ॲडमिट
माझे भाचा आणि भाची दोघेही ॲडमिट आहेत. शाळेत पाणी अथवा खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे हा त्रास झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात उद्या मी शाळेत जाणार आहे.
- सचिन करवा, पालक

Web Title: Students poisoned after eating at school; Universal High School in discussion again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.