विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग सुरु करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 08:40 PM2019-07-04T20:40:49+5:302019-07-04T20:40:55+5:30
विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वत: उद्योग सुरु करण्यासाठी पुढे येण्याची आवश्कता आहे.
वाळूज महानगर : उद्योेग क्षेत्रात अनेक नवनवीन संधी असून विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वत: उद्योग सुरु करण्यासाठी पुढे येण्याची आवश्कता आहे, असे आवाहन ‘टोस्ट मास्टर्स इंटरनॅशनल’ या जागतिक संघटनेकडून गौरविलेले अभियंता संजीव शेलार यांनी येथे केले.
वाळूज एमआयडीसीत ‘मसिआ’ संघटनेच्या वतीने बुधवारी संघटनेच्या सभागृहात आयोजित व्याख्यानात ते प्रमुख मार्गदर्शन म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मसिआचे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे, उपाध्यक्ष नारायण पवार आदींची उपस्थिती होती.
शेलार म्हणाले की, उद्योग व व्यवसाय वाढीसाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. यशस्वी उद्योजक होण्यासाठी संभाषण चातुर्य, उच्च ध्येय व नवनवीन संकल्पना आदी गुण असणे महत्त्वाचे आहेत. उद्योग व्यवसायात केवळ सकारात्मक विचार करणे गरजे आहे. जिद्द व परिश्रमाच्या जोरावरच यशाची शिखरे गाठता येत असल्यामुळे उद्योजक व विद्यार्थ्यांनी मेहनत घेण्याची गरज असल्याचे शेलार यांनी सांगितले.
कार्यक्रमात जिल्ह्यातील ७० विद्यार्थी व ३० उद्योजकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाला ‘मसिआ’चे सचिव अर्जुन गायकवाड, मनिष अग्रवाल, सचिन गायके, विकास पाटील, प्रसिद्धी प्रमुख अब्दुल शेख, राजेश मानधनी, अनिल पाटील, सर्जेराव साळुंके, अजय गांधी, भगवान राऊत आदींसह पदाधिकारी व उद्योजक उपस्थित होते.