विद्यापीठात पाण्यासाठी विद्यार्थिंनीचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 06:26 PM2018-04-20T18:26:37+5:302018-04-20T18:28:49+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पिण्याच्या पाण्यासह वापरायच्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत. विद्यार्थी वसतिगृहांमध्ये मागील अनेक दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पिण्याच्या पाण्यासह वापरायच्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत. विद्यार्थी वसतिगृहांमध्ये मागील अनेक दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. मात्र, गेंड्याची कातडी असलेल्या विद्यापीठ प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे गुरुवारी सकाळी विद्यार्थिनींच्या संतापाचा कडेलोट झाला. त्यांनी कुलगुरू निवासस्थानासमोर हंडे, बकेट घेऊन रास्ता रोको केला. शेवटी विद्यार्थी विकास संचालक डॉ़ मुस्तजीब खान यांनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
विद्यापीठात मागील काही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याविषयी ‘लोकमत’मध्ये १७ एप्रिल रोजी ‘अधिकाऱ्यांना जार विद्यार्थी बेजार’ या मथळ्याखाली या प्रश्नाला वाचा फोडली होती. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने त्यावर कोणताही तोडगा काढला नाही. विद्यापीठात मुला-मुलींची प्रत्येकी बारा वसतिगृहे आहेत़ यात ५०० मुले आणि ८०० मुली राहतात़ मागील दहा दिवसांपासून रमाबाई आंबेडकर मुलींच्या वसतिगृहात पाण्याचा ठणठणाट आहे़ यासंदर्भात तक्रार करूनही पाणी उपलब्ध झाले नाही़ गुरुवारी पाण्याचा एक थेंबही वसतिगृहातील विद्यार्थिनींना मिळाला नाही़ त्यामुळे संतप्त विद्यार्थिनींनी सकाळी ८ वाजता हातात बकेट, हंडे घेऊन थेट कुलगुरू डॉ़ बी़ ए़ चोपडे यांचे निवासस्थान गाठले़ मात्र, डॉ. चोपडे हे मुंबईला गेल्याचे त्यांना सांगण्यात आले.
यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थिनींनी रस्त्यावर ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन सुरू केले़ सकाळी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी कामावर येत होते़; परंतु विद्यार्थिनींच्या रास्ता रोकोमुळे त्यांना रस्त्यावरच ताटकळावे लागले़ आंदोलनाची माहिती विद्यार्थी विकास कल्याणचे संचालक डॉ़ मुस्तजीब खान यांना मिळताच त्यांनी विद्यार्थिनींची भेट घेतली़ त्यांच्या समस्या जाणून घेऊन रमाबाई आंबेडकर वसतिगृह, यशवंतराव चव्हाण वसतिगृहाची पाहणी केली़ पाहणीदरम्यान त्यांनी साफसफाईचा आढावा घेऊन विद्यार्थिनींना पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले़ यानंतर विद्यार्थिनींनी आंदोलन मागे घेतले़; परंतु रात्री उशिरापर्यंत त्यांना पाणी मिळालेले नव्हते़ आंदोलनात कोमल मोरे, श्रद्धा खरात, रूपाली सावे, आरती अचलखांब, किशोरी वैद्य, रेखा साळवे, रोशनी टाकणकर, आरती अंभोरे, मनीषा मगरे आदींनी सहभाग नोंदविला़.