विद्यार्थ्यांनो आधी अभ्यास करा मग शिवलिंगावर एक लोटा जल वाहा: पंडित प्रदीप मिश्रा
By प्रशांत तेलवाडकर | Published: June 5, 2023 07:39 PM2023-06-05T19:39:49+5:302023-06-05T19:40:17+5:30
'' विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल तर त्यांनी आधी अभ्यासाकडे लक्ष द्यावे, त्यानंतर शिवलिंगावर तांब्याभर पाणी वाहावे. ''
छत्रपती संभाजीनगर : ‘‘जीवनातील सर्व समस्यांचे उत्तर म्हणजे ‘भगवान शिवलिंगावर एक तांब्या पाणी चढवा,’ असे मी भाविकांना सांगत असतो. कारण यात विज्ञान दडलेले आहे. अर्थात विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल तर त्यांनी आधी अभ्यासाकडे लक्ष द्यावे, त्यानंतर शिवलिंगावर तांब्याभर पाणी वाहावे. त्यामुळे तुमच्यात सकारात्मक उर्जा निर्माण होईल, तुम्ही केलेला अभ्यास व वाढलेला आत्मविश्वास यामुळे परीक्षेत यशस्वी व्हाल,’’ असे प्रेरणादायी आवाहन पं. प्रदीप मिश्रा यांनी केले.
रविवारी सायंकाळी पं. मिश्रा यांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीशी मनमोकळा संवाद साधला. मी कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवत नाही, असे पंडितजींनी स्पष्ट केले. जे महाशिवपुराणात लिहिले आहे तेच मी सांगतो. ते सर्व विज्ञानावरच आधारित आहे. शिवलिंगात एक चेतना, उर्जा असते. तुम्ही तांब्याचा गडू असतो तो भरून पाणी त्या शिवलिंगाला अर्पण केल्यावर तांब्या शिवलिंगातील उर्जा खेचून घेतो. त्या तांब्यातील पाणी आपण प्यायल्यास त्या उर्जेने शरीरात चेतना निर्माण होते. कोणाला नोकरी लागत नाही याचा अर्थ असा नाही की, त्याने काही प्रयत्न करायचे नाहीत. त्या व्यक्तीने विविध कार्यालयांत, कंपनीत जाऊन मुलाखती द्याव्यात, सोबतच शिवलिंगावर एक तांब्या पाणी अर्पण करावे. कर्म व अध्यात्म जेव्हा सोबत येतात, तेव्हा यश हमखास मिळते, असेही पं. मिश्रा यांनी सांगितले. ते म्हणाले की, यापूर्वी छत्रपती संभाजीनगरात दोनवेळा आलो. आधी पैठणमध्ये व नंतर मारवाडी महिला संघटनेच्या कार्यक्रमात येथे येऊन गेलो. ही आता तिसरी वेळ आहे. येथील लोक दानशूर आहेत. ते समाजकार्यात, धार्मिक कार्यात, मानवी सेवेत झोकून देतात, असे म्हणत त्यांनी शहरवासीयांचे कौतुक केले. यावेळी आ. प्रदीप जैस्वाल, ऋषिकेश जैस्वाल उपस्थित होते.
नेपाळमध्ये रुद्राक्षांच्या बागा
पं. मिश्रा यांनी सांगितले की, आपल्याकडे सोयाबीन, गव्हाची शेती केली जाते. तशीच नेपाळमध्ये रुद्राक्षांची शेती केली जाते. तिथे रुद्राक्षांचे ‘वन’ आहे. तिथून आम्ही रुद्राक्ष मागवत असतो. त्यावर सिहोरमध्ये प्रक्रिया करून ते भाविकांना मोफत वाटत असतो. त्यात कृत्रिम रुद्राक्ष नसतात, असे त्यांनी विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले.