विद्यार्थ्यांना मोफत शालेय पुस्तके मिळणार;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:04 AM2021-07-02T04:04:26+5:302021-07-02T04:04:26+5:30
शिक्षण संचालकांचे शिक्षणाधिकारी यांना पत्र फुलंब्री : जिल्हा परिषद व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत शालेय पुस्तके देण्याचा ...
शिक्षण संचालकांचे शिक्षणाधिकारी यांना पत्र
फुलंब्री : जिल्हा परिषद व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत शालेय पुस्तके देण्याचा निर्णय झाला आहे. यासंदर्भात शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात कळविले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता जुनी पुस्तके वापरण्याची गरज भासणार नाही.
शालेय शिक्षण विभागाने १८ जानेवारीला आदेश पारित करून नवीन पुस्तके न देता अगोदर दिलेल्या पुस्तकांचा पुनर्वापर करण्यात यावा, विद्यार्थ्यांना दिलेली पुस्तके जमा करून ती पुढीलवर्षीच्या विद्यार्थ्यांना देण्यात यावीत, जेणेकरून कागदाची बचत होईल व येणाऱ्या काळातही विद्यार्थ्यांना पुस्तके सुस्थितीमध्ये ठेवण्याची सवय लागेल, अशा प्रकारचे आदेश शासनाने शाळांना दिले होते. पण ही पुस्तके जमा करून घेण्यात अडचणी येऊ लागल्याने, यासंबंधी वरिष्ठांपर्यंत माहिती दिली गेल्याने नवीन पुस्तके देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यामुळे येत्या दोन आठवड्यात तालुक्यातील विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके दिली जाणार आहेत. तालुक्यात १ ली ते ८ वी पर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या १९९, तर खासगी ३३ अशा २३२ शाळा आहेत. यात २७,८३७ विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.
---
२० जानेवारीच्या आदेशानुसार जुनी पुस्तके जमा करून तीच वापरण्यात यावीत, अशा सूचना होत्या. त्यानुसार सुमारे ८० टक्के जुनी पुस्तके जमा केली गेली. परंतु आता नवीन आदेशात नवीन पुस्तके देखील मिळणार आहेत, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी दिली.