विद्यार्थ्यांनी पालिकेतील गदारोळ पाहिला, अनुभवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 11:34 PM2019-02-06T23:34:22+5:302019-02-06T23:34:56+5:30
सिडको एन-२ येथील ज्ञानेश विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी बुधवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेतील गदारोळ पाहिला आणि अनुभवल्यानंतर त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना काही प्रश्न विचारले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला शाळेसारखी शिस्त नसल्याचे महापौरांनी एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.
औरंगाबाद : सिडको एन-२ येथील ज्ञानेश विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी बुधवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेतील गदारोळ पाहिला आणि अनुभवल्यानंतर त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना काही प्रश्न विचारले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला शाळेसारखी शिस्त नसल्याचे महापौरांनी एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.
महापालिकेचे प्रशासन, सर्वसाधारण सभेचे कामकाज कसे होते? हे पाहण्यासाठी ज्ञानेश विद्यामंदिरमधील इयत्ता आठवीतील विद्यार्थी बुधवारी प्रेस गॅलरीत तीन तास बसून होते. भोजन सुटीदरम्यान विद्यार्थ्यांनी महापौर घोडेले यांच्याशी संवाद करीत काही प्रश्न केले. एकाच वेळी अनेक नगरसेवकांच्या बोलण्यामुळे तुमचे डोके दुखत नाही का? त्यावर महापौर म्हणाले, डोके शांत ठेवून इथे काम करावे लागते. एकाच वेळी अनेक नगरसेवक आपल्या समस्या मांडत असल्याचे पाहिले. त्यामुळे कोण काय बोलतो हे कळतच नाही. त्यामुळे डायसवर महापौरांसह बसलेल्या सर्व अधिकारी, पदाधिकाऱ्यांना त्रास होत नाही का, गदारोळामुळे डोके दुखत नाही का? असे प्रश्न विद्यार्थ्यांनी केले. महापौरांनी सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. दुपारनंतर हे विद्यार्थी शाळेकडे रवाना झाले.
शहराच्या समस्या समजल्या
स्वच्छ पाणी, साफसफाई, चांगले रस्ते ही नागरिकांची अपेक्षा असते. ती पूर्ण करताना प्रशासनाला कसरत करावी लागते. नागरिक म्हणून आपले कर्तव्य काय, याची जाणीव झाली. शहराचे प्रश्न काय असतात हे समजले.
प्रसाद नागणे, विद्यार्थी
कोण काय बोलते हे कळत नाही
एकाच वेळी नगरसेवक आपले म्हणणे मांडत असल्याने कोण काय बोलतो हे कळत नव्हते. एका-एकाने बोलल्यास प्रश्न सुटू शकतात. सभेचे कामकाज कसे चालते याचा प्रत्यक्ष अनुभव आला.
महादेव जाधव, विद्यार्थी
---------------